नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे प्रामुख्याने काळवीट व इतर प्राणी आणि वनराईच्या संवर्धनासाठी अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. २९ फेब्रुवारी १९८० मध्ये काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले राज्यातील हे पहिलेच अभयारण्य आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. खैर, हिवर, शिसम, बाभूळ, चंदन, बोर, कडुनिंब अशी कित्येक प्रकारची झाडे येथे आढळतात. कोल्हा, लांडगा, चिंकारा, तरस, साळिंदर, मुंगूस, खोकड असे अनेक जातींचे प्राणी, १०० हून अधिक प्रजातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे येथे पाहायला मिळतात. ‘काळवीट’ या सुंदर प्राण्याच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य असल्याने येथे शेकडो हरीण आणि काळविटे बागडताना आपल्याला दिसतात.
वेगाने धावणारे व दुडुदुडु उड्या मारणारे हरीण सर्वांना आवडते. हरणांमध्ये दिसायला सुंदर, वेगवान आणि चपळ अशी काळविटाची ओळख आहे. त्यामुळे रेहेकुरी अभयारण्य हे काळविटांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येथे काळवीट पाहण्यासाठी येतात. हे काळवीट अभयारण्य पर्यटनाला पर्यटनस्थळ म्हणून चालना मिळावी. त्यातून त्या भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असे वाटते. त्या दृष्टीने रेहेकुरीच्या काळवीट अभयारण्याबाबत अधिकाधिक व नावीन्यपूर्ण माहिती देण्याचा मानस आहे. पुढील काही भागातून ही माहिती दिली जाईल. आपल्याकडे रेहेकुरी अभयारण्याबाबत काही वेगळी माहिती असेल, छायाचित्रे असतील तर नक्की आमच्याकडे (karjatlivenews@gmail.com) पाठवा. त्या माहितीचा योग्य प्रकारे वापर करून आपण सामुहिकरीत्या या पर्यटनस्थळाला चालना देण्याचा प्रयत्न करूयात !