कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे वीरशैव लिंगायत समाज हा कायमचा रहिवासी असून लिंगायत समाजाची स्मशानभूमी गावालगत सिद्धेश्वर मंदिराशेजारी शेकडो वर्षांपासून आहे. त्या जागेची अधिकृत नोंद नसल्यामुळे येथील शेतकरी लिंगायत समाजाला दफनविधी करण्यासाठी अडवणूक करीत आहेत. आताच झालेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तीच्या दफन भूमीला तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना अडचण झाली. त्यामुळे त्यांना रस्त्यालगत दफनविधी करावा लागला.
लिंगायत समाजाची संख्या भरपूर असताना देखील आणि शेकडो वर्षांपासून त्या जागी दफनविधी करत असतानाही त्या जागेची अधिकृत नोंद नाही. लिंगायत समाज हा गरीब व अशिक्षित असल्यामुळे आणि पूर्वीच्या लोकांना त्या गोष्टीची समज नसल्यामुळे अधिकृत नोंद झाली नाही. या जागेतून रस्त्यालगत पुलाचे काम चालू असताना पर्यायी रस्ता याच स्मशानभूमीतून गेला. मात्र लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या पण गावच्या विकासासाठी विरोध केला नाही. पण लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी रस्ता गेल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
या जागेवरील रस्ता हटवून समाजाची लोकसंख्या लक्षात घेऊन लिंगायत समाजाला भविष्यात पुरेल एवढी जागा आहे त्याच जागेवर उपलब्ध करून द्यावी. जागा वाढवून देण्यास या शेतकऱ्यांचा विरोध असून प्रशासनाने जागेची प्रत्यक्ष पाहणी करून व जुने पुरावे तसेच गावातील नागरिकांचा सर्वे करून योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी लिंगायत समाजाने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास दोन्ही आमदारांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. लिंगायत समाजातर्फे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, असे कोरेगाव येथील वीर शैव लिंगायत संघटनेचे सूर्यकांत कोरे यांनी म्हटले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी