दलित निधी वळवल्यास ‘हलगी बजाव’ आंदोलन; भास्कर भैलुमेंचा इशारा

कर्जत : प्रा. किरण जगताप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत कर्जत नगरपंचायतीला मंजूर झालेल्या ६४ लाख १४ हजार ५३० रुपयांच्या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी बिगर-दलित प्रभागांमध्ये वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कर्जत नगरपंचायतीचे बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे यांनी केला आहे.

या निधीचा प्रभाग क्रमांक १५ भवानीनगर, सिद्धार्थनगर आणि कुरेशीनगर या अनुसूचित जातीबहुल भागातील विकासकामांसाठी वापर करावा, अशी मागणी भैलुमे यांनी केली आहे. या प्रभागासाठी किमान ३० लाख रुपयांचा निधी तातडीने समाविष्ट करावा, अशीही त्यांची मागणी आहे.

निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्यास संबंधित अधिकारी आणि नगरपंचायत पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा भैलुमे यांनी दिला आहे. तसेच या मागणीसाठी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ‘ठिय्या’ आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कर्जत पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्याचे भैलुमे यांनी सांगितले.