
दूध घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर सात जणांनी जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे घडली. या प्रकरणी शुभम तनपुरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, वडगाव तनपुरा येथील शुभम विश्वासराव तनपुरे यांचे गावाच्या शिवारातील गट क्रमांक ३६५ (१)(अ) मध्ये अडीच एकर जमीन आहे. या शेतात जाण्यासाठी त्यांना जयश्री संदीप तनपुरे यांच्या शेताशेजारून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्याच्या वापराबाबत पूर्वीही वाद निर्माण झालेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शुभम तनपुरे हे दि. ९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास दूध घालण्यासाठी मोटारसायकलने गावाजवळील कॅनॉलवरील पुलाजवळ गेले असता तेथे उभे असलेले तुषार विलास तनपुरे, अनिकेत विलास तनपुरे, ओम संदीप तनपुरे, रामदास उत्तम तनपुरे (सर्व रा. वडगाव तनपुरा ) दिनेश बारवकर रा. पिंपळगाव, ता. जामखेड आणि आणखी दोन अनोळखी व्यक्तींनी एकत्र जमून त्यांच्यावर अचानकपणे काहीच न बोलता हल्ला केला. या हल्ल्यात शुभम यांच्या डोक्यावर, मानेला, पाठीवर, पोटावर, कंबरेवर आणि पायावर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित डेअरीचे चेअरमन बाळासाहेब जायभाय, गावातील चेतन तनपुरे आणि इतर काही ग्रामस्थांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवले.
या प्रकरणी वरील सात जणांविरुद्ध कलम ११८(१), ११५ (२), १८९, १९०, १९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंधारे करीत आहेत.