दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’

कर्जत : प्रा. किरण जगताप

दादा पाटील महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ जाहीर झाला असून, त्यांच्या कार्याचा गौरव शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माजी सहसचिव व प्राचार्य वसंत सावळाराम रोकडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. नगरकर यांच्या दीर्घकालीन समर्पित सेवेला आणि नेतृत्वगुणांना मिळालेली योग्य दाद मानली जात आहे. प्राचार्य रोकडे हे अत्यंत शिस्तप्रिय, सचोटी आणि संस्थानिष्ट होते. आशा व्यक्तींच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा मानला जातो.

डॉ. नगरकर यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, संशोधनाला चालना, तसेच शैक्षणिक व प्रशासकीय पारदर्शकता या बाबींमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने ‘A++’ मानांकन (CGPA 3.71) मिळवत राज्यातील अग्रगण्य महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवले, ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध कौशल्यविकास कार्यक्रम, करिअर मार्गदर्शन शिबिरे, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणारे उपक्रम राबवले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये टीमवर्क, शिस्त आणि उत्तरदायित्व यांची जाणीव निर्माण करत त्यांनी संस्थात्मक संस्कृती अधिक बळकट केली.

संस्थेप्रती त्यांची निष्ठा, कामाप्रतीची प्रामाणिकता आणि ‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे’ या विचारांशी असलेली बांधिलकी यामुळे ते विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, व कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर, बप्पासाहेब धांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आजी-माजी विद्यार्थी यांनी डॉ. प्राचार्य नगरकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.