
कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत सर्व १३ नगरसेवकांनी चर्चा करून याबाबतचा सर्व निर्णय घेण्याचा अधिकार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना दिला. त्यानंतर प्रा. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची अधिकृत घोषणा केली आहे.

उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले असून, त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अशी दोन्ही पदे रिक्त होणार आहेत. या रिक्त झालेल्या पदांवर उर्वरित कालावधीसाठी चार नगरसेवकांना समान कालावधीने संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रथम कालावधीसाठी नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी सचिन घुले यांची, तर उपनगराध्यक्ष पदासाठी संतोष सोपान मेहेत्रे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. द्वितीय कालावधीसाठी नगराध्यक्ष पदासाठी छायाताई सुनील शेलार यांची उमेदवारी होणार असून, उपनगराध्यक्ष पदासाठी नंतर निर्णय घेतला जाणार आहे.
दोन्ही पदाची निवडणूक झाल्यानंतर संतोष मेहेत्रे हे गटनेते पदाचा राजीनामा देतील आणि त्यानंतर नवीन गटनेत्याची निवड तातडीने करण्यात येईल, असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले आहे.