आ. प्रा. राम शिंदे हे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार आहेतच. ज्या भूमीत जन्मला त्याला भूमिपुत्र म्हणतात. आ. राम शिंदे यांचा जन्म आणि जडणघडण याच मातीत झाल्यामुळे ते अस्सल भूमिपुत्रच आहेत. ते कोणासारखे उपरे म्हणून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन डोकावलेले नाहीत. त्यामुळे ‘भूमिपुत्र’ हा ट्रेंड या भूमीतल्या जनतेतून आलेला आहे. त्यामुळे उपऱ्याला लोक त्याची जागा दाखवून देतील, असे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता नलवडे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षद परदेशी यांनी उपस्थित केलेला मुद्द्यांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नलवडे यांनी पुढे म्हटले आहे, नेहमीप्रमाणेच आणि नेत्याच्या शिकवणी प्रमाणेच राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याची भाषा खालच्या दर्जाची आलेली आहे. भूमिपुत्राचा तेरावा नक्की जेवू घालू, ही भाषा फक्त त्याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते बोलू शकतात. त्यातून त्यांची संस्कृती जनतेपुढे येत आहे. तेराव्याचे जेवण घालणारे तुम्ही कोण ? असा असा सवालही नलवडे यांनी उपस्थित केला आहे.
आ. राम शिंदे यांच्यावर बोलणाऱ्यांनी रजपूत मळ्यामध्ये कुकडीचे पाणी कोणाच्या काळात मिळाले ? हे सांगावे. आपल्यासारख्या बालिश व्यक्तीने आ. राम शिंदे यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे. आ. रोहित पवार यांची कर्जत – जामखेड ही कर्मभूमी नसून गंडवागंडवा करण्यासाठी वापरायची भूमी आहे. त्यांना आता जनता विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून देणार आहे. हे पार्सल परत बारामतीला पाठवण्यासाठी लोकांनी जोरदार तयारी केली असून भूमिपुत्राचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे, स्वाभिमानी भूमिपुत्र विरुद्ध लाचारांची फौज अशी ही विधानसभा निवडणूक होणार आहे, असेही नलवडे यांनी म्हटले आहे.