पिक विमा, लाडकी बहीण योजना, मोफत वीज पुरवठा, मागील वीज बिल माफी, वयोश्री योजना, गॅसचे तीन सिलिंडर मोफत, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कर्जत-अळसुंदा रस्ता आणि आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कुंभेफळ मधील विकास कामे झालेली आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला आमदार निधी काय असतो, हेच माहीत नव्हतं. मंत्री असताना पहिल्यांदाच आमदार निधी गावाला मिळाला.
सभामंडपाच्या माध्यमातून अळसुंदा रस्त्यापासून अंगणवाडीपर्यंत काँक्रीट रस्ता, जलयुक्त शिवार योजना, कानिफनाथ देवस्थानला पेव्हर ब्लॉक, अंगणवाडी ते राजेश धोदाड वस्तीपर्यंत काँक्रीट रस्ता, अळसुंदा रस्त्यापासून मुस्लीम वस्तीसाठी डांबरीकरण रस्ता अशी कामे झाली आहेत.
समोरच्या आमदाराकडून फक्त एक सभामंडप सोडून एकही काम झालं नाही. फक्त छत्र्या वाटणे, एकाच नंबरचे चष्मे वाटणे, मोकळे कंपास, फोटो टाकून मुलांना पुस्तक वाटणे, स्वतःवर निबंध लिहून सांगणे, चुकीचे पाढे असलेली अंकलीपी वाटणे आणि त्यावर फोटो छापणे – असे कामे करून लहान मुलांना राजकारणात आणून काय साध्य करणार आहात?
विरोधकांनी एवढी कामे केली असतील, तर एवढे लोक त्यांच्याकडून सोडून का गेले? कुंभेफळची गायरान जमीन ग्रामसभेच्या ठरावाने नाही, तर सदस्य मंडळाच्या ठरावाने दिलेली आहे. इको-सेंसेटिव्ह झोन असतानाही वन खात्याची परवानगी न घेता सत्तेच्या आणि दहशतीच्या जोरावर पॉवर प्लँट उभा केला आहे. निवडणुकीनंतर मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून, गरज पडल्यास उच्च न्यायालयातही जाणार.
त्या पॉवर प्लँटचा आजतागायत एक रुपयाचाही कर ग्रामपंचायतीला जमा झालेला नाही. जमीन गेली, पण गावाला काहीच फायदा झाला नाही. ज्यांना स्वतःची जमीन नाही, अशा गोरगरीब लोकांनी त्या जमिनीच्या आधारावर दूध व्यवसाय सुरू केला होता, जो आता बंद झाला आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. याला जबाबदार कोण?
विद्यमान आमदारांमुळे कर्जत-जामखेडच्या जनतेला फायदा कमी आणि त्रास जास्त झाला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये भूमिपुत्र, जो रात्री-अपरात्री फोन केला तरी तो घेणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणारा आमदार आम्हाला पुन्हा हवा आहे, अशी भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रा. आ. राम शिंदे साहेबांचा विजय निश्चित असून याला आता कोणीही अडवू शकत नाही, असे भाजपा किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय नलवडे यांनी म्हटले आहे.