विश्वासाच्या नात्यातील दगाफटका

कर्जत : प्रा. किरण जगताप

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की त्यांच्याशी अनोखं नातं जुळतं. त्यामुळे आपल्या बोलण्यात, वागण्यात सहजपणा येतो, ती माणसं आपलीशी वाटू लागतात. आपण आपल्या स्वप्नांची, दुःखांची, अगदी मनातल्या गुपितांची उघडपणे चर्चा करू लागतो. त्यांच्यासमोर तुटकपणा दाखवायला आपल्याला भीती वाटत नाही. कारण त्यांच्यावर आपला विश्वास असतो.

पण कधी कधी, ज्या माणसांना आपण मनापासून आपलं मानतो, त्यांच्याच हातून होणारा विश्वासघात फार खोल जखमा करून जातो. जवळच्या व्यक्तीला आपल्या जीवनातल्या प्रत्येक पानाचा ठाव असतो. कोणती गोष्ट आपल्याला दुखावते, कोणत्या क्षणी आपण असुरक्षित होतो याची त्यांना अनेक दिवसांच्या अनुभवांनी जाणीव झालेली असते. आणि म्हणूनच, त्यांच्याकडून धोका झाल्यावर तो सहजपणे विसरता येत नाही.

जेव्हा दगाबाजी होते तेव्हा फक्त नातं तुटत नाही, आपल्या आतल्या विश्वासाचेही तुकडे होतात. प्रश्न त्या एका व्यक्तीचा राहत नाही, मुळात माणसांवर विश्वास ठेवणं योग्य आहे का, असा खोल विचार डोकं वर काढतो. आपले म्हणून आपुलकीने जवळ केलेल्या व्यक्तीकडून मिळालेला दगाफटका काळजावर खोल ओरखडे उमटवतो.

पण म्हणून या नात्यांवर संपूर्ण अविश्वास ठेवायचा का? आपले आपल्यालाच उत्तर येते – नाही. नाती जपली पाहिजेत, पण अंधविश्वासाने नाही. प्रेम, आपुलकी, मैत्री या सर्व गोष्टी हव्यातच, पण त्याचवेळी स्वतःच्या मर्यादा आणि जागरूकता लक्षात घेतली पाहिजे. विश्वास ठेवताना संयम आणि शहाणपण राखणं, हेच आजच्या काळात अधिक गरजेचं असं वाटतं.

‘ज्यावर भरोसा असतो, तोच धोका देतो’– या वाक्यातील कटुता स्वीकारूनही, आपण पुन्हा नव्याने नाती जोडली पाहिजेत, पुन्हा विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. फक्त इतकं लक्षात ठेवायला हवं – आपल्याला जपणारी माणसंही जगात आहेत. अशा अनुभवातून फक्त दुःखात अडकून राहू नये. यातून शिकायला हवं, स्वतःला अधिक समजूतदार बनवायला हवं. विश्वास ठेवायचा पण डोळसपणे. अपेक्षा कमी ठेवून नाती जपायला शिकलं पाहिजे. प्रत्येक धोका, दगाबाजी, फसवणूक आपल्याला मजबूत करते. आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. त्या अनुभवातून घडून पुढे चालत राहणं हाच जीवनाचा खरा मार्ग असतो.