कर्जत पोलिसांची गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत पोलीस स्टेशनच्या पथकाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत दोन पिकअप वाहनांसह जनावरे जप्त केली. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे सव्वा सहा वाजेच्या सुमारास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन भाबड यांच्या पथकास गुप्त माहिती मिळाल्यानंतर कर्जत शिवारातील अण्णाभाऊ साठे चौक येथे सापळा रचण्यात आला. सुमारे ६.४५ वाजता राशीनकडून येणारी दोन पांढऱ्या रंगाची पिकअप वाहने अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीची जनावरे अमानुष पद्धतीने कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत श्याम केरबा कांबळे (रा. येसवडी, ता. कर्जत), सोयब राजू कुरेशी (रा. कसाब गल्ली, राशीन) आणि इरफान इस्माईल कुरेशी (रा. राशीन) यांचा सहभाग उघड झाला.

पोलिसांनी पंचासमक्ष केलेल्या पंचनाम्यात एकूण ६ गायी व १ गावरान खोंड, तसेच दोन पिकअप वाहने असा सुमारे १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित जनावरे चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने भरून त्यांना क्रूरतेने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी मनिष शिंदे करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सचिन भाबड, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, लक्ष्मण ढवळे व संजय सानप यांनी केली.