कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन ते करमाळा रोडवर अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ९० हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन जनावरांची सुटका केली असून, याप्रकरणी चालक आणि वाहन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि त्यांचे पथक राशीन परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपमधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ राशीन ते करमाळा रोडवरील जगदंबा इंडस्ट्रीजसमोर सापळा रचला. सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास संशयित वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १ गावरान बैल आणि २ जर्सी गाई अत्यंत क्रूरपणे, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

चालक अरुण भीमा गीते (रा. घुगे वस्ती, मोहरी, ता. जामखेड) याच्याकडे चौकशी केली असता, ही जनावरे जामखेड तालुक्यातील खर्डा येथील इरफान हशम कुरेशी याच्या मालकीची असून ती कत्तलीसाठी नेली जात असल्याची कबुली त्याने दिली.
या कारवाईत पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीची जनावरे आणि ५ लाख रुपयांचे पिकअप ( एमएच १६, सीडी २२०९) असा एकूण ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण भीमा गीते आणि इरफान हशम कुरेशी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, किरण बारवकर, राजेंद्र थोरात, प्रवीण सुतार, शेषराव अनारसे, दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे आणि मच्छिंद्र जाधव यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार करत आहेत.