
कर्जत तालुका सीड्स, पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स असोसिएशनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्जतच्या तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, येत्या ८ दिवसांत यावर ठोस निर्णय न झाल्यास सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ पासून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कृषी विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे, खत कंपन्यांकडून होणारी रासायनिक खतांची ‘लिंकिंग’ पद्धत बंद करावी, अशी प्रमुख मागणी विक्रेत्यांनी केली आहे. तसेच शेजारील राज्यांतून येणारे अवैध एचटीबीटी कपाशी बियाणे आणि दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांवर कडक बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘साथी’ पोर्टलचा वापर केवळ उत्पादक कंपन्यांच्या स्तरापर्यंत मर्यादित ठेवावा आणि तो विक्रेत्यांवर सक्तीचा करू नये, असेही यात नमूद केले आहे. याशिवाय, रासायनिक खतांचा पुरवठा ‘FOR’ पद्धतीने करावा आणि विक्रेत्यांच्या विक्री मार्जिनमध्ये वाढ करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
विक्रेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना असोसिएशनने म्हटले आहे की, विक्रेता सीलबंद पॅकिंगमध्ये बियाणे विकतो. त्यामुळे सॅम्पल नापास झाल्यास विक्रेत्याला आरोपी न करता केवळ ‘साक्षीदार’ मानावे. कृषी विभागाने तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत ६ एप्रिल २०२६ रोजी काढलेली अधिसूचना रद्द करून जुनीच व्यवस्था कायम ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मुदतबाह्य कीटकनाशके कंपन्यांनी परत घ्यावीत आणि नवीन बियाणे कायदा २०२५ मधील जाचक नियम शिथिल करावेत, याकडेही शासनाचे लक्ष वेधले आहे.

प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी सोमवारपासून दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवेदनावर अध्यक्ष, सचिव यांच्या सह्या आहेत. या निवेदनामुळे जिल्हा प्रशासनासह कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

