
कर्जत येथील संजीवनी वाईन्स दुकानासमोर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर लोखंडी रॉड, दगड, लाकडी दांडके आणि फायबरच्या पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून, याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीतील माहितीनुसार, दि. १ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कर्जत येथील संजीवनी वाईन्स दुकानासमोर ही घटना घडली. फिर्यादी तेजस्विनी सिताराम भैलुमे (वय २०, रा. सिद्धार्थनगर, कर्जत) यांचा भाऊ दत्ता भैलुमे यांच्यासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अक्षय विठ्ठल राऊत, आशिष हनुमंत राऊत, किरण राऊत ( तिघे रा. कर्जत) आणि महादेव शिंदे (रा. कापरेवाडी, ता. कर्जत) यांनी दत्ता भैलुमे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, खोऱ्याचे लाकडी दांडके, दगड आणि फायबरच्या पाईपने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दत्ता भैलुमे यांच्या बरगडीवर गंभीर मार लागला असून त्यांचे दोन्ही हात व पायावर मारून दुखापत करण्यात आली. तसेच यावेळी मध्यस्थी आलेले प्रणव गोरे (रा. कर्जत) यांनाही आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.
या घटनेदरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय कर्जत, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर आणि ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तेजस्विनी भैलुमे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


