
कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कर्जत पोलिसांनी बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत दोन ग्राहकांसह एकूण ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

कर्जतचे नूतन पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की, आखोणी (ता. कर्जत) गावच्या शिवारात, राशीन ते भिगवण जाणाऱ्या रोड लगतच्या चव्हाण वस्तीवरील एका घरामध्ये अवैध वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे, पोलीस कर्मचारी, डमी ग्राहक आणि दोन पंचांसह सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला.

छाप्यादरम्यान, दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघड झाले. या व्यवसायासाठी एका महिलेने आपल्या घरातील खोली उपलब्ध करून दिली होती. पोलिसांना घटनास्थळी दोन ग्राहक आणि रोख रक्कम ३९०० रुपयांसह वेश्या व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य मिळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्व साहित्य जप्त करून त्याचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी रमेश नामदेव टापरे (वय ४५ वर्ष, रा. शारदानगर, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे), जागा मालक व वेश्या व्यवसायासाठी खोली उपलब्ध करून देणारी महिला आणि घटनास्थळी मिळून आलेले दोन ग्राहक अशा एकूण ४ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गोविंद हिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपींविरुद्ध ‘स्त्रिया व मुली अनैतिक प्रतिबंध अधिनियम १९५६’ चे कलम ३, ४, ५ अन्वये दि. ४ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे, सहाय्यक फौजदार आण्णासाहेब चव्हाण, पोलीस हवालदार प्रवीण सुतार, वैभव गांगडे, अमोल रायकर, मनोज मुरकुटे, विशाल क्षीरसागर, अर्जुन पोकळे, योगेश सुपेकर, किरण बोराडे, प्रकाश दंडाडे, गोविंद हिंगे, सचिन झुनगुर आणि महिला होमगार्ड निकीता बेलेकर यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करत आहेत.
कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठेही अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनच्या ०२४८९- २२२३३३ या क्रमांकावर किंवा ११२ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन कर्जत पोलिसांनी केले आहे.

