
भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत व जनसंपर्कात सक्रिय असलेले कार्यकर्ते चंद्रशेखर खरमरे यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे कर्जत तालुक्यासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरमरे यांनी ग्रामपातळीवर संघटन बांधणी, जनसंपर्क, विविध सामाजिक उपक्रम आणि पक्षवाढीसाठी सातत्याने काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतील नियोजन, बूथ व्यवस्थापन आणि पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
या निवडीमागे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा शेखर खरमरे यांच्यावरील विश्वास, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ महत्त्वाचे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा प्रा. राम शिंदे यांनी कायम राखल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
शेखर खरमरे यांची ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठा, कष्ट आणि जनसेवेच्या भावनेचा गौरव असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास नियोजनात तालुक्याच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व टाकळी खंडेश्वरी येथील परशुराम हराळ यांनी चंद्रशेखर खरमरे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

