उंबराचे लवण शाळेतील बालदिंडीत साक्षात विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील शिंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबराचे लवण येथे शनिवारी (दि. १८) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उत्साहपूर्ण बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेचा संस्कार चिमुकल्यांवर रुजविणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी तसेच वारकऱ्यांचा वेश परिधान करून उपस्थितांची मने जिंकली.

पताका, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, महिलांच्या फुगड्या आणि फेर यांच्या संगतीने संपूर्ण परिसर पंढरीच्या वारीच्या भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. अंगणवाडी आणि शाळेतील चिमुकले विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने दिंडीला विशेष आकर्षण लाभले.

उंबराचे लवण येथील ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून, पूजन करून, फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच खाऊ व पंगतीच्या माध्यमातून बालवारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दिंडीत सहभागी मुलांसाठी जेवणाची पंगत, बिस्किटांचे पुडे, लाडू, चहा आणि इतर खाऊचेही उत्तम नियोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण गाव भक्ती, संस्कार आणि आनंदाच्या वातावरणात न्हाऊन निघाले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका राणी शिवाजी राऊत, सहशिक्षिका स्मिता भराटे, अंगणवाडी सेविका उषा उद्धव घालमे, मदतनीस सुनिता मनोज घालमे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत गणपत कदम, उपाध्यक्षा मेघा शेखर घालमे, समितीचे सर्व सदस्य तसेच पालक यांच्या सहकार्याने करण्यात आले.

मुलांच्या भोजन पंगतीचे नियोजन अमोल संजय घालमे यांनी केले. कुंडलिक आबा घालमे यांनी बिस्किटांचे पुडे, अमोल सुभाष घालमे यांनी दामट्याचे लाडू, तर विष्णू भिकाजी घालमे यांनी चहा व खाऊचे वाटप केले. आप्पा चव्हाण यांनी सर्वांना चंदनाचा गंध लावून भक्तिमय वातावरण अधिकच मंगलमय केले. उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे बालदिंडी सोहळा अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.