
कर्जत शहरातील गावठाण हद्दीतील जागेवर बेकायदेशीरपणे पत्र्याचे कंपाउंड उभारून जागा हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कर्जत येथील रहिवासी बाळासाहेब बापूराव जाधव यांनी केला आहे. याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी १९५० रोजीच्या कबुलायतच्या आधारे कर्जत गावठाणातील ही जागा त्यांच्या मालकी हक्काची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंबादास शंकर पिसाळ, रा. कर्जत यांनी या जागेत कथितरीत्या बेकायदेशीरपणे पत्र्याचे कंपाउंड उभारले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणात महसूल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय दबावामुळे आपल्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला असून अंबादास शंकर पिसाळ हे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. हे आरोप संबंधितांकडून सिद्ध झालेले नसून त्यांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बाळासाहेब जाधव यांनी केली आहे. अन्यथा १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना, अंबादास पिसाळ म्हणाले, बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ असलेली कागदपत्रे सादर करावीत आणि न्यायालयात जाऊन संबंधित जागा त्यांच्या मालकीची असल्याचे सिद्ध करावे. ही जागा माझी असून ती माझ्या पूर्वजांनी खरेदी केलेली आहे. या जागेच्या खरेदीसंदर्भातील कागदपत्रांच्या नकला तसेच उतारे, फेरफार नोंदी आणि इतर आवश्यक कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधित कागदपत्रांच्या आधारेच या प्रकरणाचा योग्य तो निर्णय व्हावा.

