अजिनाथ कचरे जोगेश्वरवाडी येथून बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील जोगेश्वरवाडी येथील अजिनाथ यशवंत कचरे (वय ४४) हे २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नी निता अजिनाथ कचरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिली आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पतीचे अपहरण करून त्यांना पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, निता कचरे या कुटुंबासह जोगेश्वरवाडी येथे राहतात. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास निता कचरे या घरकाम करत असताना त्यांचे पती अजिनाथ यांनी काही व्यक्तींनी उसनवार पैसे घेतल्याची बनावट नोटरी करून घेतली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून घरात झोपले. २६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामावरून आल्यानंतर निता कचरे यांना त्यांचे पती घरात दिसले नाहीत. त्यांनी घराच्या आजूबाजूला तसेच गावात आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र अजिनाथ कचरे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण करून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल करण्यात आली.

अजिनाथ कचरे यांचे वय ४४ वर्षे असून ते जोगेश्वरवाडी, ता. कर्जत येथील रहिवासी आहेत. त्यांची उंची सुमारे पाच फूट पाच इंच, अंगाने सडपातळ, रंग गोरा, केस काळे, नाक सरळ असून त्यांनी पांढऱ्या रंगावर निळ्या चौकडीचा शर्ट परिधान केला होता, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी निता कचरे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अजिनाथ कचरे यांचा शोध घेण्यात येत आहे.