
वन्यजीव सप्ताह २०२६ च्या पहिल्याच दिवशी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी काळवीट अभयारण्य परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता झालेल्या या मोहिमेत रेहेकुरी, मिरजगाव व श्रीगोंदा वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी, वन कर्मचारी आणि वनमजूर सहभागी झाले.

कर्जत–वालवड रस्त्यालगत अभयारण्याच्या हद्दीच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, घरगुती कचरा, कपडे, फर्निचरचे अवशेष, वेष्टन साहित्य तसेच इतर कचऱ्याचा समावेश होता. वन कर्मचाऱ्यांनी हा कचरा गोळा करून वाहनाद्वारे योग्य ठिकाणी विल्हेवाटीसाठी नेला.

अभयारण्य परिसरात कचरा टाकल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो. प्लास्टिक, वैद्यकीय कचरा, औषधे, काच व इतर घातक वस्तूंमुळे वन्यप्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्जत–वालवड रस्त्यालगत सलूनचा कचरा, वैद्यकीय कचरा किंवा इतर कचरा अभयारण्य परिसरात टाकू नये. कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्ती, दुकान मालक किंवा डॉक्टर यांच्यावर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेहेकुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मारोती मुळे यांनी दिला.
नागरिकांनी अभयारण्य परिसरात कचरा न टाकता वन्यजीवांचा अधिवास स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

