
कर्जत तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या माहितीसाठी दरपत्रक, डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, उपलब्ध सेवा आणि इतर आवश्यक माहितीचे फलक लावावेत, तसेच आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या इतर आवश्यक बाबींची पूर्तता करावी, या मागणीसाठी युवक क्रांती दलाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची आरोग्य विभागाने दखल घेत तालुक्यातील १०२ हॉस्पिटलना आवश्यक बाबींची पूर्तता करण्याबाबत लेखी नोटिसा बजावल्या होत्या.

या नोटिसांनंतर तालुका आरोग्य विभागाने तालुक्यातील सर्व १०२ हॉस्पिटलची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीत १०२ पैकी ६ हॉस्पिटलमध्ये आवश्यक बाबींची पूर्तता अद्याप झालेली नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये भांबोरा, खेड, चापडगाव आणि जळगाव येथील हॉस्पिटलचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी दिली.

युवक क्रांती दलाने निवेदनातून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार घेण्यापूर्वी आवश्यक माहिती पारदर्शकपणे उपलब्ध व्हावी, यासाठी उपचारांचे दरपत्रक, डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता यासह विविध आवश्यक माहितीचे फलक लावण्याची मागणी केली होती. तसेच आरोग्य विभागाच्या नियमांनुसार आवश्यक इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली होती.
आंदोलनानंतर आरोग्य विभागाने प्रथम १०२ हॉस्पिटलना लेखी नोटिसा देऊन आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत ६ हॉस्पिटलमध्ये अद्याप त्रुटी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या हॉस्पिटलना अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे.
अंतिम नोटीस देऊनही आवश्यक बाबींची पूर्तता न करणाऱ्या हॉस्पिटलवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. राजेंद्र सांगळे यांनी स्पष्ट केले. युवक क्रांती दलाने रुग्णांच्या हक्कांचा आणि हॉस्पिटलमधील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या आंदोलनानंतर आरोग्य विभागाने या कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे युवक क्रांती दलाच्या आंदोलनाला प्राथमिक यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

