कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये पालकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आरटीईमधून प्रवेश होऊनही पालकांना फीची मागणी केल्याची तक्रार पालक, पत्रकार किरण जगताप यांनी शिक्षण विभागाकडे दाखल केली आहे.भ
भाग : १
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) त्याचा प्रवेश झालेला आहे. या कायद्यान्वये या विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क ही शासनाकडून भरली जाते. तरीही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून या विद्यार्थ्याच्या पालकांकडे शैक्षणिक शुल्काच्या वसुलीसाठी शाळेमधून तगादा लावला जात आहे. २४ ऑगस्ट २०२३ रोजी १२.१० वाजता ९५१८७२१०९१ या मोबाईल क्रमांकावरून जगताप यांना कॉल आला. कॉलरवर अशोक आजबे असे नाव दाखवत असून त्यांनी तुमच्या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची १३००० रुपये फी तात्काळ भरून टाका, असे सांगितले.
त्यावर पालकाने माझ्या मुलाचा आरटीईमधून प्रवेश झाला आहे, तरीही फी भरायची आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी एकूण १३००० एवढी फी असून त्यातील ७००० रुपये फी आता भरावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे या शाळेमधून फीच्या नावाखाली पालकांची नियमबाह्य पद्धतीने आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
पुढे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, माझ्या पाल्यांसाठी याच शाळेतून शालेय गणवेश तसेच पुस्तके यांची सक्तीने खरेदी करायला लावली. त्यानुसार गणवेश तसेच पुस्तके शाळेमधून खरेदी करण्यात आले. या खरेदी वेळी शाळेकडून पावती देण्यात आलेली नाही. या शाळेमधून गणवेश, पुस्तके याची पालकांना सक्तीने खरेदी करायला लावली जात असून या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. कोणतेही शुल्क आकारल्यानंतर पालकांना विहित नमुन्यातील पावत्या या शाळेमधून दिल्या जात नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकाराची महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग तसेच शिक्षण विभागाकडून संस्था, प्राचार्य व शालेय व्यवस्थापनाच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी तक्रार करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाकडे शाळेतील गैरकारभाराविषयी तक्रार केल्यामुळे माझ्या पाल्यास शाळेमधून सापत्न वागणूक व मानसिक त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतही शिक्षण विभागाकडून शालेय प्रशासनास योग्य सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
याबाबत कर्जतचे गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांना विचारले असता त्यांनी, पूर्ण माहिती घेवून योग्य कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
कर्जत तालुक्यातील पालकांची या व अशा प्रकारची आर्थिक लूट केली जात असेल तर त्याची माहिती ‘कर्जत लाईव्ह’ला 7030952275 व्हाटस्ॲप वर द्यावी.