‘उतारा’ टाकलेला ‘तो’ नारळ सामूहिकपणे खाण्याचा प्रेस क्लबचा निर्णय

कर्जत : प्रा. किरण जगताप

उतारा म्हणून टाकलेला व सर्व बाजूंनी टाचण्या खोसलेला नारळ शुक्रवारी दुपारी पत्रकार किरण जगताप यांच्या कुळधरण येथील शेतात आढळून आला. अंधश्रद्धेतून हा नारळ टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर सोशल मीडियातून चर्चा करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने सामाजिक संदेश देण्यासाठी कर्जत तालुका प्रेस क्लबच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘मी हा नारळ खाणार आहे, आपण खाल का ?’ अशी त्यांनी पत्रकार बांधवांना विचारणा केली. त्यावर अनेक पत्रकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

‘उतारा’ म्हणून टाकलेला नारळ हा भारलेला नसतो, त्यात कोणतीही अद्भुत शक्ती येत नाही. त्या नारळामुळे मानवी शरीरावर, मनावर कसलाही परिणाम होत नाही, हा व असा जनजागृती करणारा सामाजिक संदेश देण्यासाठी आपण सामूहिकपणे हा नारळ खाऊ, असा निर्णय पत्रकारांनी घेतला. रविवारी होणाऱ्या पत्रकारांच्या बैठकीत या नारळाचे सेवन केले जाणार आहे.

कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष योगेश गांगर्डे, उपाध्यक्ष किशोर कांबळे, सचिव किरण जगताप, खजिनदार अस्लम पठाण, सदस्य महादेव सायकर, संतोष रणदिवे, मिलिंद राऊत व इतर पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहे. स्वेच्छेने कोणीही यामध्ये सहभागी होऊ शकतात.

अज्ञानापोटी या आजाराचे कारण बाहेरची बाधा, भूतबाधा, भानामती, करणी, दृष्ट लागणे असल्या अशास्त्रीय समजांमध्ये शोधतात. या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दैवी उपचाराच्या नावाखाली लबाड लोकांकडून फसविले जाते. त्यांचा वेळ, पैसा व आरोग्याची वाट लावून त्यांचे शोषण केले जाते. पैसे तसेच मोठेपण मिळविण्यासाठी अनेक भोंदू महाराज हे रुग्णांना वेगवेगळ्या अपसमजाखाली लुबाडतात. बऱ्याच वेळेला योग्य वेळी उपचार न झाल्याने, रोगी दगावतो, कायमचे व्यंग निर्माण होते.

‘कर्जत लाईव्ह’चे आवाहन : आपण हे करु शकता !

भूत, भानामती या निव्वळ कल्पना आहेत. त्यात मानवी मनाची फसवणूक आहे. करणी, मूठ मारणे, मंत्रतंत्राने काहीही वाईट होऊ शकत नाही हा दिलासा सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचे शोषण थांबविले पाहिजे. वेगवेगळे अशास्त्रीय रिपोर्टस्, बातम्या, लेख आणि वृत्तपत्रांमधल्या व पुस्तकांमधल्या गोष्टींमधून सुशिक्षितांतही या अंधश्रद्धांचे नकळत रोपण केले जाते. त्यामुळे जादूटोणा, मंत्रतंत्राचे वायफळ अर्थशून्य महत्त्व आपण स्वप्रयत्नाने कमी करायला हवे. माणसे मानसिक व शारीरिक रुग्ण होतात. यात वाईट नशीब, दैवयोग, साडेसाती, कुणाची वाईट नजर, भानामती, कुणी कुणावर केलेली करणी, कुणी कुणाला मारलेली मूठ, ग्रहांचा व दैवतांचा कोप या कुठल्याच निरर्थक गोष्टींचा संबंध नाही.

आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींशी या गोष्टींबाबत चर्चा करा. त्यांचे गैरसमज चिकाटीने व सातत्याने दूर करा. फसवणुकीचे प्रकार आढळल्यास निर्भयतेने त्याचा प्रतिकार करा. विज्ञानदृष्टी जोपासण्यासाठी आपल्या बोलण्यात, लिहिण्यात विज्ञानदृष्टी ठेवा. आपल्या मुलांच्या मनामध्ये अंधश्रद्धा रुजणार नाहीत, याची काळजी घ्या. साहित्यात, व्यवहारात अंधश्रद्धा वाढतील असे काही आढळल्यास आपल्या अधिकारात सामाजिक बांधिलकी म्हणून या गोष्टींना शक्य तेवढा विरोध समाजासमोर येऊन प्रकट करा. पूर्ण माहिती मिळविल्याशिवाय, चमत्कारांवर व अशा सनसनाटी बातम्यांवर चटकन आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्यास आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांची माहिती द्या.

कर्जत लाईव्ह व्हॉट्सॲप : 7030952275