कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड व कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी दिले आहेत. पालक किरण जगताप यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेवून ही चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
भाग : ७
याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये दुसरीत शिकत असलेल्या संस्कार जगताप या विद्यार्थ्याचा आरटीईमधून प्रवेश होऊनही १३००० रुपयांच्या फीची सक्तीने मागणी करण्यात आल्याने पालक किरण जगताप यांनी विविध ७ मुद्द्यांच्या आधारे शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकाराच्या चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांची नियुक्ती केली होती. मात्र विस्ताराधिकारी गायकवाड यांनी केलेल्या चौकशीतच अनेक गैरप्रकार उघड झाल्याने जगताप यांनी गायकवाड यांच्या कामकाजासह कोटा मेंटॉर्स शाळेची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी फेरतपासणीसाठी २ विस्तार अधिकारी व एक केंद्रप्रमुख अशा तीन सदस्यांच्या समितीची नेमणूक केली आहे.
काय आहेत आक्षेप :
१) २४ ऑगस्ट २०२३ रोजी कोटा मेंटॉर्स शाळेचे कार्यालयीन कर्मचारी अशोक आजबे यांनी जगताप यांना फोन कॉल करून सक्तीने १३००० रुपयांच्या फीची मागणी केली होती. याबाबत अशोक आजबे यांनी माफी मागितली असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे. मात्र आरटीईमधून प्रवेश होऊनही पालकांना कॉल करून सक्तीने पैशाची मागणी केल्याने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चे उल्लंघन झालेले आहे. ही बाब कारवाईस पात्र असतानाही चौकशीसाठी नेमलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात ‘पालकाची तक्रार कमकुवत वाटते’, असे नमूद केलेले आहे. शाळेतील कर्मचाऱ्याने फिची सक्तीने मागणी केल्याच्या प्रकाराबाबत शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत शिक्षण विभागाने शाळेवर योग्य कारवाई करावी.
२) शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या शाळेच्या हजेरी पत्रकात तिसऱ्या क्रमांकावर श्रीम. धोदाड रोहिणी सुदाम या सहशिक्षिकेची सही व चौकशी दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे दिलेल्या अभिप्रायावरील त्याच सहशिक्षिकेची सही यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. त्यावरून विस्तार अधिकारी यांनी चौकशी दरम्यान बनावट कागदपत्रे स्वीकारल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून त्याचा लेखी खुलासा शिक्षण विभागाने करावा व दोषींवर योग्य कारवाई करावी.
३) शाळेच्या इमारतीचा वापर शालेय कामकाजाव्यतिरिक्त इतर कामासाठी करण्यात येऊ नये असा शासनाचा आदेश आहे. मात्र शाळेतून गणवेश, पुस्तके व इतर शालेय साहित्याची विक्री करून शाळेतूनच दुकान चालवले जात आहे. त्याचा पुरावाच विस्तार अधिकाऱ्यांनी अहवालासोबत दिलेला आहे. अहवालासोबत त्यांनी शाळेतून क्रमिक पुस्तके विकल्याचा तपशील तसेच पालकांकडून घेतलेल्या पुस्तकांच्या फी बाबतची लेखी माहिती दिलेली आहे. या पुराव्यानुसार शाळेतून विद्यार्थ्यांना पुस्तकांची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून शासकीय नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने शिक्षण विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात यावी.
तक्रारीमध्ये दिलेल्या अनेक मुद्द्यांची शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आलेली नाही. ही चौकशी का टाळण्यात आली ? त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व कर्तव्यात कसूर केलेली आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई करावी.
क्रमशः