पुढील वर्षासाठी १ रुपया प्रति लिटर दिवाळी बोनस देण्याची घोषणा
कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथील शिवम दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना या दिवाळीत ५० पैसे प्रति लिटर दिवाळी बोनस वाटप करण्यात आले. संकलन केंद्राचे चेअरमन बाबासाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली या दूध संकलन केंद्राने त्यांच्याकडील दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त शनिवारी बोनसचे वाटप केले.
पुढील वर्षी पराग मिल्क मंचर तर्फे ५० पैसे प्रति लिटर आणि चेअरमन बाबासाहेब धांडे यांच्यातर्फे ५० पैसे प्रति लिटर असे मिळून १ रुपया दिवाळी बोनस देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धांडेवाडी परिसरातील शेतकरी व दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दूध उत्पादकांच्या सोयीसाठी शिवम दूध संकलन केंद्राकडून गोळी पेंड, भुसा याचे मापक दरात वितरण केले जाते. दूध उत्पादकांसाठी मुरघास करण्यासाठी मोफत कुट्टी मशीन व शेतीची कामे करण्यासाठी पेरणी, नांगरणी, रोटर इत्यादी कामांसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आहे.
या दिवाळी बोनसचे वितरण सद्गुरु उद्योग समूहाचे चेअरमन श्री शंकर नेवसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पराग मिल्क मंचरचे अधिकारी श्री प्रवीण पाटील साहेब, नानासाहेब वाघमारे साहेब, धांडेवाडीतील माजी सरपंच चंद्रकांत धांडे, सतीश धांडे, विलास धांडे, घालमे सर व सर्व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
वैभव पवार, कर्जत तालुका प्रतिनिधी