आईसाहेबांचे हे वागणे सर्वांनाच खटकले !

कर्जत : प्रा. किरण जगताप

आई ही सर्वांची सारखीच असते. तिच्या भावना आणि प्रेम हे समानच असतात. म्हणूनच आपण प्रत्येकजण आपल्या आईला एकेरी नावाने “ये आई” या पद्धतीने संवाद साधत असतो.
मागच्या महिन्यात कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कर्जत आणि परिसरात चार वर्षे पूर्ण झाल्याने व गेल्या १४६० दिवसांपासून न थांबता श्रमदान करून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या संघटनांच्या शिलेदारांनी या कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या, मदत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील सभागृहात आयोजित केला होता.

यावेळी विद्यमान आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार, ज्यांना मतदारसंघात “आईसाहेब” म्हणून ओळखतात व इतर काही मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जात होता. या संघटनेला आम्हीही वैयक्तिक, प्रतिष्ठान आणि पक्षाच्या माध्यमातून मदत करत असतो, म्हणून या कार्यक्रमाला आमंत्रित होतो.

माजी खा. सुजयदादा विखे यांनी या उपक्रमासाठी पाचशे टी गार्ड (स्वरक्षित जाळ्या) दिल्याने त्यांच्या वतीने व भाजपा पक्षाचे जिल्हा सरचिटणीस या नात्याने माझा सन्मान आणि सत्कार झाला. स्टेजवर नाव पुकारले जाताच, आईसाहेबांनी हातातील सन्मानपत्र व झाडाचे रोप दुसऱ्या मान्यवरांच्या हातात देऊन त्या मागे उभे राहिल्या. त्यांच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण सभागृहात आणि शिलेदारांमध्ये चर्चा झाली.

नक्कीच आ. रोहित पवार यांच्या चुकीच्या मुद्द्यांवर आणि धोरणांवर विरोधक म्हणून गेली पाच वर्षे मी आवाज उठवला आहे. परंतु एका सामाजिक व सार्वजनिक सन्मानाच्या कार्यक्रमात त्यांनी आम्हाला अशी वागणूक देणे हे मला तसेच सभागृहातील सर्वांना खटकले. थोड्या कालावधीनंतर, आम्ही केलेल्या वैयक्तिक मदतीबद्दल व गौराईच्या वेळी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचा देखावा ठेवला होता, म्हणून विशेष सन्मानासाठी पुन्हा एकदा माझे व माझी पत्नी सौ. सुवर्णा पोटरे यांचे नाव पुकारले. स्टेजवर गेलो असता पुन्हा आईसाहेब मागे गेल्याचे पाहून, आमचा सन्मान करणे त्यांना कमीपणाचे वाटत असल्याचे जाणवल्याने मुद्दामहून आईसाहेबांना आम्ही राजकारणाचे जोडे बाहेर काढून आलो असल्याचे सांगितले व सन्मान तुमच्याच हाताने घ्यायचा आहे, असे ठणकावल्याने त्यांना आमचा सन्मान करणे भाग पडले.

ज्या परिवाराला या कर्जत- जामखेडने आमदारकीचा सन्मान दिला त्या परिवारातील व्यक्तींच्या आईला या मतदारसंघाने “आईसाहेब” म्हणून मान दिला. आणि जिथे त्यांच्या हस्ते सन्मान होत असताना, जर आमचा असा अपमान करत असाल, तर तो माझा एकट्याचा अपमान नाही. कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण सभागृहात या प्रसंगाची चर्चा चालू होती, अशा अनुभवांचे कथन अहिल्यानगर भाजपा दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केले.