हा तर भूमिपुत्रांचा मोठा अपमान !

कर्जत : प्रा. किरण जगताप

कुकडीच्या अशासकीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी कर्जत तालुक्याचा भूमीपुत्र न निवडता श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांची आ. रोहित पवार यांनी निवड करण्याचे कारण काय ? कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आ. रोहित पवार यांनी द्यावे.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात कुकडी कॅनॉल ला नियमित व वेळेवर आवर्तन न मिळाल्याने कर्जत तालुक्यातील कुकडी पट्ट्यातील फळबागा, शेती जळून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अभ्यासाचा अभाव, मीपणा, स्वतःच्या पक्षा सहित महाविकास आघाडीच्या भूमीपुत्र नेते कार्यकर्त्यांना मोठे होऊ न देण्याचे मनसुबे, एकाधिकारशाही व हवेत गेलेल्या आ. रोहित पवार यांनी कर्जत तालुक्याच्या कुकडीच्या पाण्यासाठी, वेळेवर आवर्तन सुटण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कुकडी बाबत अडचणी सुटून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचा हक्काचा कर्जत तालुक्याचा प्रतिनिधी देणे अत्यंत गरजेचे असताना मतदारसंघातून दुसरे कोणी मोठे होऊ नये तसेच आपल्यातच कोणी स्पर्धक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या कुकडी अशासकीय सल्लागार पदी श्रीगोंदा येथील श्री. घनश्याम शेलार यांची निवड केली.

त्याचवेळी कुकडी पट्ट्यातील वरील सर्व आमदारांनी आपल्या तालुक्यातील चांगल्या अभ्यासू व्यक्तींची निवड केली होती. त्यावेळी आपण या विषयावर आवाज उठवून या पदावर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भूमीपुत्र कार्यकर्त्यांची निवड करण्याची आ. पवार व महाविकास आघाडी सरकारकडे मागणी केली होती.


त्यामुळेच कुकडी पाण्यासाठी आम्हाला आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे लागले व त्यामुळे प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पाडले.
परंतु स्वहिताच्या कोणी आड आले तरी बळी देण्याच्या भूमिकेमुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा बळी देणाऱ्या आ. पवारांना आता घरी पाठवण्याची वेळ आली असून पाणीदार आमदार श्री. राम शिंदे यांना निवडून देण्याची वेळ आली आहे, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हटले आहे.