सिद्धटेक येथील वेदांत हॉटेल आणि मोबाईल शॉपीमध्ये १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. विजय तांदळे यांच्यावर हल्ला करणारे आठ आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला, असल्याची माहिती फिर्यादी विजय तांदळे यांनी दिली.
विजय तांदळे यांच्या मालकीच्या वेदांत हॉटेल आणि मोबाईल शॉपी येथे झालेल्या हल्ल्यात तांदळे यांना लोखंडी रॉड, पाईप आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. या प्राणघातक हल्ल्यात तांदळे यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता. यातील मुख्य आरोपी तानाजी खोमणे, राहुल खोमणे, गोकुळ खोमणे, विनायक खोमणे, अंबादास खोमणे, बाळू खोमणे, अजित खोमणे, अमित खोमणे यांच्यावर विविध गंभीर कलमांखाली राशीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही पोलिसांनी आरोपींना पकडलेले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सिद्धटेक येथील ग्रामस्थ आणि दुकानदारांनी या संतापाच्या पार्श्वभूमीवर गाव बंद ठेवून पोलिसांवर दबाव आणला. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे, परंतु अद्याप पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही.
फिर्यादीच्या वतीने जिल्हा न्यायालयात अँड. सुमित पाटील यांनी तोंडी व लेखी स्वरूपात प्रभावी युक्तिवाद केला, त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. इतक्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पोलिसांना आरोपी सापडत नाहीत, हे आश्चर्याचे कारण बनले आहे. वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटूनही आरोपी अद्याप फरार असल्यामुळे मला न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करून मला न्याय मिळवून द्यावा, असे फिर्यादी विजय तांदळे यांनी म्हटले आहे.