अळसुंदे विद्यालयातील शिक्षक मोहन बनसुडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

कर्जत : प्रा. किरण जगताप

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक मोहन दिनकर बनसुडे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना करताना आपल्या कौटुंबिक अथवा सामाजिक जीवनातील समस्यांचा परिणाम आपल्या अध्यापन कार्यावर होऊ न देता विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा वसा त्यांनी पाळला असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी केंदळे यांनी मांडले. विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बाळासाहेब साळुंके यांनी अळसुंदे येथील बनसुडे यांच्या कार्याचा सन्मानपूर्वक उल्लेख करून त्यांना भविष्य काळातील निरामय आरोग्य व इच्छित फलप्राप्तीच्या शुभेच्छा दिल्या. बनसुडे यांचा नम्र स्वभाव आणि प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभागी होण्याची वृत्ती याविषयी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे यांनी स्वलिखित बनसुडे यांच्या मानपत्राचे वाचन करताना सर्व उपस्थित ग्रामस्थ, नातेवाईक ,शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मन हेलावले आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

सेवापूर्ती सोहळ्याच्या दिवशी मोहन बनसुडे व त्यांच्या पत्नी स्वाती मोहन बनसुडे यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असल्याने उभयतांचा सुवासिनींच्या हस्ते औक्षण आणि पुनर्विवाह सोहळा त्यांचे चिरंजीव तनिष्क, कन्या तन्वी व सर्व नातेवाईक व शिक्षक यांच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सदर प्रसंगी साजरा करण्यात आला. याप्रसंगी रिलायन्स उद्योग समूह मुंबई येथे कार्यरत असणारा आयआयटी .इंजिनियर आणि सरांचा सुपुत्र तनिष्क मोहन बनसुडे व सरांची सुकन्या डॉ. तन्वी मोहन बनसुडे सेवानिवृत्तीनंतर आई वडिलांच्या अपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे अभिवचन दिले व सरांच्या सासु श्रीमती कुसुम जाधव यांनी उभयतांना शुभाशीर्वाद दिले.

याप्रसंगी उज्वला संतोष बनसुडे, सपना राजाराम जाधव, पोपट विठ्ठल शेलार, पार्वती पोपट शेलार, जयश्री बळीराम बनकर, राजाराम बाबुराव जाधव, गजेंद्र बाबासाहेब जाधव, वंदना गजेंद्र जाधव, अनिल पांडुरंग जाधव, दीपिका अनिल जाधव, भारत नाना बनसुडे, रेश्मा भारत बनसुडे या नातेवाईक व स्नेहीजनांनी बनसुडे यांचे शुभचिंतन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मोहन बनसुडे व पत्नी स्वाती बनसुडे यांचा सत्कार करण्यात आला. या शुभचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वसंत चटाले, कोंडीबा झगडे, अंकुश खरात, दत्ता नेवसे, नवनाथ धांडे, जिजाबापू अनारसे, अनिल गाडे, सर्जेराव गदादे, श्री. राऊत, दिलीप खंडागळे व महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य चौरे, दत्ता नेवसे या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मोहन बनसुडे यांचा जीवनपट उलगडून दाखवला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामा कृष्णा अनारसे यांनी भूषविले तर शिवाजी निवृत्ती केंदळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड व अनुमोदन अनुक्रमे प्रवीण कांबळे व सुरेश कुमार देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील गोरखे यांनी केले. विद्यालयातील नितीन जगताप यांच्यासह अळसुंदे व देमनवाडी परिसरातील सर्व पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, अळसुंदे गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी मोहन बनसुडे यांना शुभेच्छा दिल्या व सेवापूर्ती झाल्याने निरोप दिला.