गरीबीचा अनुभव माणसं घडवतो !

कर्जत : प्रा. किरण जगताप

जगायला केवळ पैसा लागतो असं नाही, जगण्यासाठी लागतो धीर, जिद्द आणि परिस्थितीशी झुंजायची ताकद. प्रतिकूल परिस्थिती ही माणसाची खरी परीक्षा असते. अनेकदा वाटतं, का आपल्याच वाट्याला हे सगळं येतंय ? पण हेच अडथळे, हेच दुःख, हेच अभाव माणसाला घडवत असतात.

प्रतिकूल परिस्थितीतून माणूस शिकतो. जीवनातील अडचणी त्याला कळतात, तो स्वतःशी संवाद साधू लागतो. अनेक ठिकाणी ठेच लागल्यानंतर माणूस नव्याने उभा राहतो आणि प्रयत्नशील राहतो. एक नवी ऊर्जा, नवीन काही शिकण्याची मानसिकता त्याच्या मनात निर्माण होते.

त्याच्या नजरेत बदल होतो. तो लहान लहान गोष्टीकडे सूक्ष्म दृष्टीने पाहू लागतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, त्याला काहीतरी शिकवतो. त्याची निरीक्षणशक्ती वाढते. त्याला जगण्याची नवी जाण मिळते. बिकट परिस्थिती त्याला त्याला सामाजिक जाणीव देते. तो इतरांच्या दुःखाकडे डोळसपणे पाहतो. त्याच्या मनात माणुसकीचा गहिवर जागा होतो. तो दुसऱ्याच्या दुःखाला आपले दुःख मानतो.

अभावाचं जीवन खूप काही शिकवून जातं. काही कमी पडलं, तरच माणूस ते मिळवण्यासाठी धडपड करतो. त्या प्रयत्नातूनच तो घडतो. त्याच्या जीवनाला आकार मिळतो. सगळं सहज मिळालं तर त्याला त्याची किंमत कळत नाही. त्याच्या मनात धडपड करण्याची गरजच निर्माण होत नाही. प्रयत्न करण्याची भावना निर्माण होत नाही. कृतिशीलतेची उमेद निघून जाते.

असेच अभाव, अशीच गरिबी – माणसाला आपल्यातलं खरं सामर्थ्य दाखवते. जेव्हा हातात साधनं नसतात, तेव्हा मनातील शक्ती काम करते. जेव्हा कोणी आधार देत नाही, तेव्हा स्वतःच आपल्याला आधार बनावं लागतं. मग तो माणूस भूतकाळाकडे पाहून, भविष्याकडे निघतो. त्याला जर जीवनात संघर्षाची वेळच आली नाही, तर त्याच्यात शिकण्याची, धडपडण्याची वृत्ती वाढत नाही.

गरिबी, अभाव, अडचणी – या सगळ्या गोष्टी मनाला दुखावतात, पण त्या शिकवतातही. आणि या शिकवणीतून एक खरा, संवेदनशील, प्रयत्नशील माणूस तयार होतो, असे वाटते.