
कर्जत तालुक्यातील शिंदे येथे वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल आणि कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून अवघ्या दोन दिवसांत वाफा डीपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिंदे परिसरात काही दिवसांपासून वीज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत ग्रामस्थांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल आणि कुळधरण गटाचे प्रमुख किरण घालमे यांनी तातडीने संबंधित वीज विभागाशी संपर्क साधून पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत केवळ दोन दिवसांत वाफा डीपी बसविण्याचे काम पूर्ण केले. डीपी बसवल्यामुळे आता परिसरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना आवश्यक वीज उपलब्ध होणार आहे.


या कामामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढेही असेच प्रयत्न सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली.


