मराठा समाजातील स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळाले नाही

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत–जामखेड मतदारसंघातील मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेतृत्वाच्या प्रश्नावर अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. गावपातळीवर भांडणे, जातीपातीचे राजकारण आणि स्वतःच्या आडनावाला मोठेपणा देण्याची स्पर्धा वाढल्याने समाजाची एकजूट कमकुवत झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर स्वतःला बादशहा म्हणवून घेण्याची प्रवृत्ती वाढली असली तरी समाजाचे एकत्रित नेतृत्व मात्र कमी होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.

पूर्वी या मतदारसंघात आबासाहेब निंबाळकर, बापूसाहेब देशमुख, बी. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. तापकीर, महादेव राळेभात, गोपाळराव पाटील, गोलेकर, जगन्नाथ राळेभात, दादासाहेब पवार आदी नेत्यांमुळे मराठा समाजाची राजकीय ओळख आणि ताकद निर्माण झाली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यात मराठा समाजाची प्रतिष्ठा टिकून होती. सध्या मात्र त्या पातळीचे नेतृत्व कमी झाल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे. सध्याच्या काळात तालुक्याचे नेतृत्व केलेल्या नेत्यांमध्ये बापूसाहेब गुंड यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवर मतदारसंघ राखीव राहिल्यामुळे मराठा समाजाचे नेतृत्व मर्यादित राहिले. परिणामी मराठा समाजाला अनेकदा इतरांचे नेतृत्व स्वीकारावे लागले. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांतील मराठ्यांमध्ये परस्पर संबंधही कमी असल्याचे काहींचे मत आहे. मतदारसंघ सर्वसाधारण झाल्यानंतर मराठा समाजात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या काळात अनेक मराठा नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले; मात्र मतदारसंघाचा मोठा विस्तार आणि मतदानाचे समीकरण याची पुरेशी कल्पना नसल्याने काही निर्णय चुकल्याचेही सांगितले जाते. त्या पराभवाचा परिणाम नेत्यांपेक्षा समाजावर जास्त झाला अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर मतदारसंघात रोहित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पवार कुटुंबीयांचा वारसा आणि माजी आमदारांविषयी असलेली नाराजी यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे काही कार्यकर्त्यांचे मत आहे. पहिल्या निवडणुकीत मिळालेले सुमारे ६० टक्के मतदान हे मराठा समाजाकडून आले असल्याचा दावा देखील काही कार्यकर्ते करतात.

मात्र निवडणुकीनंतर मराठा समाजातील स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळाले नाही अशी टीका होत आहे. मतदारसंघात मराठा समाजातील सक्षम नेतृत्व तयार करण्याची गरज होती परंतु भूमिपूजनापासून लोकार्पणापर्यंत सर्व कामांमध्ये स्वतःच पुढे राहण्याची पद्धत निर्माण झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही असेही आरोप काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सभापती यांना अपेक्षित महत्त्व न देता वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू झाल्याचीही टीका व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या वेळी मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. मात्र निवडणुकीनंतर समाजातील अनेक कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केल्याची भावना काहींनी मांडली. प्रवीण घुले, राळेभात, तापकीर, गुंड, शेवाळे, शेलार, भोसले, पांडुळे यांसारख्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा देखील करण्यात येतो. रोहित पवार यांचा विजय केवळ सुमारे सहाशे मतांनी झाला असल्याचे सांगत काही कार्यकर्त्यांनी त्या मतांचे गणित आणि त्यामागील कारणांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या राजकीय परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दोन्ही तालुक्यांमधील १५६ ग्रामपंचायतींपैकी सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्याची गरज असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, धोत्री, लेणेवाडी आणि पाडळी यांसारख्या गावांमधील मतदानावर मराठा आंदोलनाचा प्रभाव पडल्याचा दावा देखील करण्यात येतो. दरम्यान, माजी आमदार राम शिंदे यांनी शक्य त्या ठिकाणी मराठा समाजाचा सन्मान केल्याचे मान्य केले पाहिजे असेही काही कार्यकर्त्यांचे मत आहे. मात्र त्यांच्या सभोवती वाढलेली गर्दी पाहता भविष्यात तेही सर्वांना न्याय देऊ शकतील का असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्जत–जामखेड मतदारसंघातील मराठा समाजाने एकत्र येऊन नवे नेतृत्व निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. समाजातील तरुणांनी एकत्र येत “स्वाभिमानी मराठा विचार मंच” स्थापन करून समाजाची ताकद संघटित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. “अभी नही तो कभी नही” अशी घोषणा देत समाजाने आता स्वाभिमानाच्या प्रश्नावर एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.