कर्जत तालुक्यात वाढतेय शिवसेनेची ताकद ; युवकांचा पक्षप्रवेश

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत असून नुकत्याच पार पडलेल्या एका प्रवेश सोहळ्यात अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तालुका शिवसेना प्रमुख नितीन तोरडमल तसेच कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या सोहळ्यात सागर घालमे, अजय घालमे, अभिजित घालमे, सोमनाथ घालमे, राजेंद्र घालमे, कृष्णा घालमे, सौरभ पुष्कर, अवधूत घालमे, ओमकार घालमे आणि अजित जगताप यांनी शिवसेनेच्या ध्येय-धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. या सर्व युवकांनी पुढील काळात पक्ष बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याची ग्वाही दिली.

यावेळी किरण घालमे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी पक्षसंस्था आहे. युवकांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केल्याने संघटनेला नवे बळ मिळणार असून आगामी काळात विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवण्यात युवकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नव्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या युवकांच्या प्रवेशामुळे कर्जत तालुक्यात शिवसेनेचा जनाधार आणखी मजबूत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.