थेरवडी तलावासाठी पाणी सोडण्याची मागणी; आत्मदहन आंदोलनाचा इशारा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशिन, तोरकडवाडी, थेरवडी, सोनाळवाडी व पिंपळवाडी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर थेरवडी तलावात कुकडी आवर्तनातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.
भाजपा तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड यांनी तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी, कर्जत यांना निवेदन देत प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर तत्काळ कार्यवाही झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

धोदाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, थेरवडी तलाव हा परिसरातील नागरिक, पशू-पक्षी व जनावरांसाठी मुख्य पाणीस्रोत आहे. मात्र कुकडी प्रकल्पातून आवर्तनाचे पाणी सोडले जात नसल्याने तलाव कोरडा पडत आहे. गेल्या दहा दिवसांपासून कुकडी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप त्यांनी केला.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील व विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी कुकडी आवर्तनाचा कालावधी एक दिवसाने वाढवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले जात असतानाही प्रशासनाकडून अंमलबजावणीत हलगर्जीपणा होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.

एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता थेरवडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते. मंगेश थोरात, जालिंदर विटकर, रावसाहेब गोडसे, उत्तम थोरात, प्रदीप धुमाळ, निलेश धुमाळ, विशाल गोडसे, सोमनाथ धुमाळ, ईश्वर तोरकड, गोविंद मोरे, पोपट धुमाळ, अभिमन्यू गव्हाणे, दिपक गव्हाणे, संकेत दिवसे, अमोल भोंडवे, अण्णासाहेब काळे, सुनील गोडसे, बबन काळे, तुकाराम काळे, सचिन धुमाळ यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.