आ. रोहित पवार ‘गायब’ असल्याच्या टीकेवर ‘राष्ट्रवादी’चे प्रत्युत्तर

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आरोप- प्रत्यारोपांचा जोरदार फड रंगला आहे. भाजपचे सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार मतदारसंघातून चार महिन्यांपासून गायब असल्याची टीका करत राजकीय वातावरण तापवले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथील पदाधिकारी भूषण ढेरे यांनी यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार हे चार महिन्यांनी कर्जत- जामखेडमध्ये येत आहेत. ते राहुल गांधींना भेटतात, राज्यभर आणि देशभर फिरतात; मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप केला.

यावर प्रत्युत्तर देताना भूषण ढेरे म्हणाले की, यादव यांना रोहितदादा पवार यांच्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. बोलायचे असेल तर त्यांनी कोंभळीच्या एमआयडीसीबाबत बोलावे, नगरपंचायतीबाबत बोलावे. घुले बंधूंना भाजपमध्ये घेतले, पण त्यांनी काही दिवसांतच पक्ष का सोडला, याचे उत्तर द्यावे. विकासासाठी घुले यांना घेतले होते, मग विकास कुठे गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ढेरे पुढे म्हणाले, तुमच्या नेत्याने नगरपंचायतला एकही रुपयाचा निधी दिला नाही. कसलाच विकास केला नाही. या मुद्द्यांवर यादव यांनी बोलावे. यादव हे फक्त उठसूट रोहित पवार यांच्यावर बोलून तोंडसुख घेत आहेत.

ढेरे म्हणाले, तुमचे नेते हे चार दिवसांनी कर्जतला येऊन काय काम केले, ते जनतेला माहित आहे. आ. रोहितदादा पवार यांच्या घरात दुःखद घटना घडली होती, त्यामुळे त्यांना कर्जतमध्ये यायला विलंब झाला. या काळात तुमच्या नेत्याने केलेले एखादे काम सांगा. रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. तुमच्या नेत्याकडे मात्र फक्त आडवाआडवी करण्याचे व्हिजन आहे. यापुढे आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ढेरे यांनी दिला आहे.