
१८ जुलै २०१७ च्या पहाटे कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रत्नाकर मकासरे, पोलीस नाईक एस.डी. लोखंडे आणि चालक बबन पवार हे सरकारी वाहनातून गस्त घालत होते. चापडगावकडून कर्जतकडे जात असताना त्यांना एक पांढरा पिकअप संशयास्पद रित्या येताना दिसला. चालक बबन पवार यांनी इशारा करूनही पिकअप थांबला नाही, उलट तो वेगाने पळून जाऊ लागला. संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता, त्या गाडीत चोरीच्या तीन गायी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चापडगावजवळ पोलिसांनी पिकअपला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, पिकअपमधील आरोपीने अग्नीशस्त्रातून चालक बबन पवार यांच्यावर थेट गोळी झाडली. गोळी उजव्या खांद्याला लागल्याने बबन पवार गंभीर जखमी झाले आणि नियंत्रण सुटल्याने पोलीस वाहन एका भिंतीला धडकले.
या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी रत्नाकर मकासरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान रेवणनाथ प्रभाकर जाधव, रा. वीट ता.करमाळा आणि पद्मराज अर्जुन ढोणे, रा. मिरजगाव यांना अटक करण्यात आली होती, मात्र आकाश उर्फ अक्षय बाजीराव गायकवाड, रा. मिरजगाव ता. कर्जत हा ९ वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर हा आरोपी पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील सचिन भाबड, बबन पवार, सागर जंगम, रोहित मिसाळ, मनोज लातूरकर आणि पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने संयुक्त सापळा रचला.
१६ एप्रिल २०२६ रोजी चिंचवडगाव, पिंपरी चिंचवड परिसरातून अक्षय ऊर्फ आकाश बाजीराव गायकवाड याला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली. ९ वर्षांपूर्वी पोलिसांच्या अंगावर गोळी झाडणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.



