कृषी विभागाचा राशीनमधील राजवीर कृषी सेवा केंद्रावर छापा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथील ‘राजवीर कृषी सेवा केंद्र’ येथे प्रतिबंधित बी.एच.सी. पावडर आणि थायमेट यांसारख्या घटकांची विक्री होत असल्याची तक्रार समोर आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत कर्जत तालुका कृषी विभागाने संबंधित केंद्राच्या गोदामावर छापा टाकून विविध नमुने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने कर्जत लाईव्ह’वरून नुकतीच बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल मारुती लष्करे यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली होती की, संबंधित कृषी सेवा केंद्रामध्ये शासनाने निर्बंध घातलेली उत्पादने विकली जात आहेत. या माहितीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, गुणनियंत्रण कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे आणि उप-कृषी अधिकारी एन. एस. शिंदे यांच्या पथकाने तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली. या पथकाने तक्रारदाराच्या समक्ष राजवीर कृषी सेवा केंद्राच्या गोदामाची झडती घेतली.
या तपासणीदरम्यान गोदामात आढळलेल्या विविध साठ्याबाबत पथकाने संशय व्यक्त केला असून, त्यांचे अधिकृत नमुने सील करण्यात आले आहेत. हे सर्व नमुने तांत्रिक तपासणीसाठी पुणे येथील शिवाजीनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर माल प्रमाणित आहेत की बनावट, हे स्पष्ट होणार आहे.

तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे. तक्रारीनुसार आम्ही प्राथमिक कारवाई करून नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त होताच कायद्यानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईत तक्रारदार अनिल लष्करे हे देखील उपस्थित होते. सध्या संपूर्ण तालुक्यात या कारवाईची मोठी चर्चा सुरू असून, प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.