कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कर्जत : प्रा. किरण जगताप

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात यंदा ज्ञान आणि अर्थक्रांतीचा जागर अनुभवायला मिळाला. भास्कर भैलुमे मित्र मंडळाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांवर आधारित ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ची भव्य आणि देखणी प्रतिकृती साकारण्यात आली होती. केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, डॉ. आंबेडकरांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कसा रचला, हे या देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आले. ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या त्यांच्या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेची संकल्पना कशी उदयास आली, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मंडळाने केला. गेल्या १५ वर्षांपासून प्रबोधनपर विषय हाताळण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम राखली आहे.

या देखाव्याला शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, नगराध्यक्षा रोहिणी घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, युवा नेते सचिन घुले, जिल्हा बँक संचालक अंबादास पिसाळ, भाजप नेते सचिन पोटरे व अशोक खेडकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भैलुमे, रिपाईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, नगरसेवक विशाल काकडे, भाऊसाहेब तोरडमल, रविंद्र सुपेकर तसेच रिपाई शहराध्यक्ष सोहन कदम यांनी भेट देऊन मंडळाच्या कल्पकतेचे कौतुक केले. “डॉ. बाबासाहेबांचे राजकीय व सामाजिक कार्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे अर्थतज्ज्ञ म्हणून असलेले योगदानही तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,” असे मत प्रविण घुले यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर भैलुमे मित्र मंडळ, मोटार मालक-चालक संघटना व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रिझर्व्ह बँकेची प्रतिकृती आणि माहिती फलक पाहताना नागरिक मंत्रमुग्ध होत होते. बाबासाहेबांनी हिल्टन यंग आयोगासमोर मांडलेल्या विचारांपासून बँकेच्या स्थापनेपर्यंतचा इतिहास या निमित्ताने कर्जतकरांना अनुभवता आला. शहरात या देखाव्याची मोठी चर्चा असून, महामानवाच्या जयंतीनिमित्त साकारलेल्या या वैचारिक अभिवादनाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.