मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा ; कर्जतमध्ये भाजपाचे पोलिसांना निवेदन

कर्जत : प्रा. किरण जगताप

भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चेन्नई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खरगे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत दहशतवादी असा अपमानास्पद आणि मानहानीकारक उल्लेख केला असा आरोप भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड यांनी केला आहे.

हे वृत्त विविध माध्यमांत प्रसिद्ध झाले असून याबाबतचे व्हिडिओ, वृत्तकात्रणे आणि इतर पुरावेही जोडण्यात आले आहेत. धोदाड यांनी निवेदनात म्हटले आहे की हे वक्तव्य केवळ वैयक्तिक टीका नसून देशाच्या सर्वोच्च लोकशाही पदाचा अवमान करणारे आहे. पंतप्रधानांच्या प्रतिमेला धक्का बसून जनतेत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वातावरण दूषित होऊ शकते आणि लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. या निवेदनात भारतीय दंड संहिता कलम ४९९ (मानहानी) व ५०० (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा नोंदवावा तसेच परिस्थितीनुसार इतर लागू तरतुदींचा विचार करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

असे विधान करणाऱ्यांना कायद्याने वागवले नाही तर राजकारणात अपमानाची संस्कृती वाढेल. या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटर यांनी सांगितले मल्लिकार्जुन खर्गे यांनी संबंध देशाचा अपमान केला आहे. भारतीय संसदीय लोकशाही पदाचा अपमान केला आहे त्यामुळे गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पोटरे यांनी नमूद केले की निवडणूक आयोगानेही खरगे यांना नोटीस दिल्याचे वृत्त समोर आले आहे. हे विधान लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन असून पंतप्रधानांसारख्या राष्ट्रीय नेत्याबाबत अशी भाषा असह्य आहे.

कर्जत मंडल अध्यक्ष गदादे म्हणाले काँग्रेस नेते देशाच्या पंतप्रधानांना दहशतवादी म्हणतात ही राजकारणाची पातकी पातळी आहे. भाजप सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढेल. मागे हटणार नाही. कर्जत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेतली असून तपास प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. हे प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले असून भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

यावेळी तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कर्जत मंडल अध्यक्ष अनिल गदादे, राशिन मंडल अध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे, गणेश पालवे, प्रसाद ढोकरीकर, उदयसिंह राजपूत, शिवाजी काळे, स्वप्नील तोरडमल, पांडुरंग भंडारी, दत्ता गोसावी, धनंजय आगम, नंदलाल काळदाते, मंगेश थोरात यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली.

हे प्रकरण आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यभरात अशा तक्रारी दाखल करण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आंदोलनाची तयारी करत असून या घटनेमुळे स्थानिक राजकारणात नवे वळण येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.