
स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगणारा भोंदू बाबा मनोहर भोसले उर्फ ‘मनोहर मामा’ याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. लोकांची आर्थिक फसवणूक करणे, पैशांचा अपहार करणे आणि महिलांचे लैंगिक शोषण करणे अशा गंभीर आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरात छापा टाकून त्याला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मनोहर मामा हा चमत्काराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या खिशातील नोटांचे क्रमांक अचूक सांगतो, असा दावा करून त्याने स्वतःची मोठी ओळख निर्माण केली होती. या अंधश्रद्धेमुळे त्याचे अनेक भक्त तयार झाले होते, ज्यांच्याकडून त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक राजकीय नेते आणि मोठे सरकारी अधिकारी देखील त्याच्या दरबारात हजेरी लावत असत. काही जण राजकीय फायदा किंवा मोठ्या पदाच्या आमिषाने त्याचा सल्ला घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचे नावही चर्चेत आले आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी या अधिकाऱ्याने चक्क हेलिकॉप्टरने या बाबाच्या दरबारात हजेरी लावली होती. अशा स्वयंघोषित बाबांमुळे समाजाची होणारी दिशाभूल आता समोर आली आहे. या अटकेनंतर भोंदूगिरी करणाऱ्यांचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस आता या प्रकरणाचे सर्व धागेदोरे शोधत आहेत.

