कोरेगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील भीमनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भीम जयंती उत्सव समिती कोरेगाव यांच्या वतीने उत्साहात करण्यात होते.

गुरुवार दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी स्मारक पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बुद्ध वंदना, अभिवादन, पुष्पांजली अर्पण तसेच विचारमंथन आणि मान्यवरांची भाषणे आयोजित करण्यात आली होती. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सजविलेला रथ, बँड पथक, डीजे साऊंड सिस्टिम आणि आकर्षक स्टेज व्यवस्था हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. गावातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.

मिरवणुकीनंतर उपस्थित नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी