पोलीस पाटील दादासाहेब भोसले यांना ‘विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार’ प्रदान

कर्जत : प्रा. किरण जगताप

​अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागांतर्गत येणाऱ्या बेर्डी गावचे पोलीस पाटील दादासाहेब गणपत भोसले यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेबद्दल राज्य शासनाचा पोलीस पाटील ‘विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचा प्रथम प्रस्ताव तत्कालीन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी पाठवला होता, तर याची पुढील तांत्रिक पूर्तता विद्यमान उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी करून दिली. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक मुक्काम्मा सुदर्शन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य सोहळ्यात दादासाहेब भोसले यांना हा सर्वोच्च बहुमान देऊन गौरविण्यात आले. भोसले यांच्या १५ वर्षांच्या यशस्वी व गौरवशाली कारकिर्दीला मिळालेली ही एक मोठी पावती मानली जात आहे.

​दादासाहेब गणपत भोसले हे २ जुलै २००९ पासून बेर्डी (ता. कर्जत) येथे पोलीस पाटील म्हणून अखंडितपणे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पदावर काम करताना अत्यंत प्रामाणिकपणे, चारित्र्यसंपन्न आणि सचोटीने काम केले असून त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कोणताही खटला किंवा दावा दाखल झालेला नाही, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासकीय वा न्यायालयीन शिक्षा झालेली नाही. त्यांचे वर्तन पोलीस पाटील या पदास अत्यंत शोभनीय आणि आदर्श राहिले असून याच निष्कलंक सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
​दादासाहेब भोसले यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्याच पार पाडल्या नाहीत, तर संवेदनशील सामाजिक विषयांवरही मोलाचे काम केले आहे.

सिद्धटेक मंदिर परिसरात आढळून आलेल्या अल्पवयीन बेवारस मुलांना सुखरूपपणे पोलीस स्टेशनला पोहोच करून, त्यांनी बाल मदत केंद्रात पाठवण्यासाठी विशेष सहकार्य केले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच मानवी दृष्टिकोनातून त्यांनी केलेले हे काम संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत उल्लेखनीय ठरले आहे.
​या विशेष पुरस्कारासाठीच्या कडक निकषांनुसार किमान १० वर्षे सेवा आणि १० प्रशस्तीपत्रे असणे आवश्यक असते. मात्र, दादासाहेब भोसले यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत विविध वरिष्ठ कार्यालयांकडून तब्बल १५ हून अधिक प्रशस्तीपत्रे व प्रशंसापत्रे मिळवून आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांचे प्रशस्तीपत्र, तहसीलदार कार्यालय कर्जत यांची विविध वर्षांतील तीन प्रशस्तीपत्रे, उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जतचे प्रशस्तीपत्र, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत विभागाकडून मिळालेले तीन विशेष सन्मान, कर्जत पोलीस स्टेशनकडून उत्कृष्ट कामाबद्दल मिळालेली चार प्रशस्तीपत्रे, तसेच मंडल अधिकारी कार्यालय भांबोरा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कर्जत उपविभागाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या विशेष प्रशस्तीपत्रांचा समावेश आहे.
​महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार, पोलीस पाटलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार व विशेष सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. बेर्डी गावातील शांतता, सलोखा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात मोठा वाटा असणाऱ्या आपल्या पोलीस पाटलाला हा सर्वोच्च बहुमान मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष प्रदान झाल्यामुळे संपूर्ण कर्जत तालुक्यातून, प्रशासकीय वर्तुळातून आणि बेर्डी ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.