योग्य हेल्थ प्लॅनरकडूनच हेल्थ इन्शुरन्स घ्या : महेंद्र बागल यांचे आवाहन

कर्जत : प्रा. किरण जगताप

आजच्या वाढत्या आरोग्य समस्यांमुळे आणि महागड्या उपचारांमुळे हेल्थ इन्शुरन्स ही प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाची अत्यावश्यक गरज बनली आहे. अनेक लोक भविष्यातील सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स घेतात मात्र विमा घेताना योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे अनेकांना क्लेमच्या वेळेस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

याबाबत बोलताना सिनियर सेल्स ऑफिसर महेंद्र बागल यांनी सांगितले की, हेल्थ इन्शुरन्स घेताना फक्त नाते ओळख किंवा इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नये. अनेक वेळा ग्राहकांना चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊन पॉलिसी विकली जाते. सुरुवातीला सर्व गोष्टी चांगल्या वाटतात पण प्रत्यक्ष क्लेमची वेळ आल्यावर ग्राहकांना नियम, अटी आणि प्रक्रियेमुळे त्रास सहन करावा लागतो.

ते पुढे म्हणाले की, आरोग्य विमा हा फक्त एक कागदाचा व्यवहार नसून तो संकटाच्या काळातील आर्थिक आधार असतो. त्यामुळे असा हेल्थ प्लॅनर निवडणे खूप महत्त्वाचे आहे. जो ग्राहकाला योग्य माहिती देईल, पॉलिसी समजावून सांगेल आणि गरजेच्या वेळी हॉस्पिटल व क्लेम प्रक्रियेत मदत करेल.

बागल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, फक्त कमी प्रीमियम, आकर्षक ऑफर किंवा नातेसंबंध पाहून हेल्थ इन्शुरन्स घेऊ नका. पॉलिसीमध्ये काय कव्हर आहे, काय नाही, वेटिंग पीरियड व त्यांनी मार्केटमध्ये आजपर्यंत किती क्लेम दिले आहेत, कॅशलेस सुविधा, हॉस्पिटल नेटवर्क आणि क्लेम प्रक्रिया याबाबत पूर्ण माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या माहितीवर घेतलेला विमा भविष्यात आर्थिक व मानसिक त्रास देऊ शकतो.

आज अनेक कुटुंबांना मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत योग्य हेल्थ इन्शुरन्स आणि विश्वासू हेल्थ प्लॅनर हेच कुटुंबासाठी मोठा आधार ठरतात. त्यामुळे विमा घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आणि अनुभवी मार्गदर्शकाची निवड करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.