आठवणीतील पिसे सर

कर्जत : प्रा. किरण जगताप

इयत्ता आठवीत असताना आमच्या आयुष्यात आलेले आदरणीय तुकाराम रावसाहेब पिसे सर म्हणजे शिस्त, जिद्द, संस्कार आणि मायेचे जिवंत विद्यापीठच होते. धिप्पाड देहयष्टीचा तो राजबिंडा युवक दररोज आपल्या बुलेटवरून महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात सर्वांच्या आधी येत असे. पाऊस असो, थंडी असो किंवा कडक उन्हाळा पिसे सर वेळेआधी शाळेत हजर असायचे. आम्ही गावाकडची मुले तालुक्याच्या ठिकाणी खोलीवर राहत होतो. पहाटेच आमच्या आया गरमागरम भाकऱ्या थापून, वांग्याचे भरीत डब्यात भरून पाठवत असत. त्या भाकरीच्या पापडामध्ये अलगद दहा रुपयांची नोट ठेवलेली असायची. त्या काळातील आईची माया आणि संघर्ष आजही डोळ्यांत पाणी आणतात.

सर वर्गात आले की इंग्रजीचे पुस्तक, हातात खडू आणि टेबलावर भलीमोठी छडी ठेवत असत. सर्वप्रथम वर्गातील गैरहजर विद्यार्थ्यांची चौकशी होत असे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची आस्थेवाईक विचारपूस करून मगच अध्यापनाला सुरुवात होत असे. इंग्रजीसारखा विषयसुद्धा सर इतक्या सोप्या भाषेत शिकवत की प्रत्येक विद्यार्थ्याला तो सहज समजत असे. समजलं का? हा त्यांचा आवर्जून विचारायचा प्रश्न आजही कानात घुमतो. त्या काळी आमचा शाळेचा गणवेश म्हणजे खाकी हाफ चड्डी, पांढरा सदरा आणि डोक्यावर टोपी. अनेक मुलांच्या चड्ड्यांना ठिगळं असायची पण कुणालाच त्याची लाज वाटत नसे. पिसे सर नेहमी म्हणायचे, नवनाथ ठिगळाच्या पँटची लाज वाटून उपयोग नाही; अभ्यासात मागे राहण्याची लाज वाटली पाहिजे. सरांचे प्रत्येक वाक्य जीवनाचा धडा देणारे असे.
ते नेहमी म्हणत, Time and tide wait for none. म्हणजेच वेळ आणि पाण्याची लाट कोणासाठीही थांबत नाही. आत्या काळी बहुतांश विद्यार्थी सायकलवरून शाळेत येत असत. कुणाच्या सायकलला पाण्याचा ड्रम, कुणाच्या सायकलला रॉकेलचा ड्रम, तर कुणाच्या सायकलला दळणाची पिशवी लटकलेली असे. सीटवर एक, नळीवर एक आणि मागे कॅरेजवर एक असा आमचा प्रवास असे. ज्याची सायकल असे तो सीटवर बसून हँडल पकडायचा आणि बाकीच्यांनी पायडल मारायचे त्या संघर्षातही आनंद होता.

दुपारी शाळा सुटल्यानंतरही आमचे शिक्षण थांबत नसे. महामुनी सर, चव्हाण सर, साळवे सर, वांगडे सर, शिंदे सर, मुळे मॅडम, शेलार सर, घाडगे सर, शेंडगे सर आणि पिसे सर आम्हाला जादा तास घेत असत. कारण त्यांना माहिती होते की ही शेतकऱ्यांची मुले आहेत छपराच्या घरात दिव्याखाली अभ्यास करणारी आहेत. इंग्रजी व्याकरणातील Direct-Indirect, Hardly-When, No sooner than, Not only but also, Preposition आणि Summary हे भाग तर त्यांनी अक्षरशः तोंडपाठ करून घेतले. प्रसंगी हातातील कणखर छडी आमच्या पिंडऱ्यांवर बसत असे पण त्यामागे राग नव्हता तर आमच्या भवितव्याची तळमळ होती. घरी तक्रार केली तर पालक म्हणायचे आणखी मारा म्हणजे अभ्यास करेल. २२ सप्टेंबर कर्मवीर अण्णांची जयंती आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हती. शेंडगे सर, घाडगे सर, पिसे सर, वांगडे सर रात्री उशिरापर्यंत ढोल-लेझीमचा सराव घेत असत. त्यातूनच मी उत्कृष्ट लेझीम शिकलो आणि आज माझे अनेक विद्यार्थी उत्कृष्ट लेझीमपटू झाले आहे याचा मला अभिमान वाटतो.

सरांनी दिलेली वेळेची किंमत, जिद्द आणि परिश्रमाची शिकवण यामुळे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक आणि कृषी क्षेत्रात मोठे यश मिळवले. काही विद्यार्थी परदेशातही स्थायिक झाले. त्या काळी अनेकांकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसत. अशावेळी सर स्वतःच्या खिशातून फी भरत असत. विद्यार्थ्यांवर मायेची सावली धरून त्यांना उभं करण्याचं मोठं काम त्यांनी आयुष्यभर केलं. सरांची तीनही मुले उच्चशिक्षित आहेत. मुलगा भालचंद्र पिसे हे वकील असून मुली शीतल भोसले आणि अंजली रोकडे या आदर्श प्राथमिक शिक्षिका आहेत. जावई सुनील भोसले हे उत्कृष्ट कलाशिक्षक आहेत. सेवानिवृत्तीनंतरही सर थांबले नाहीत. ते एक आदर्श शेतकरी बनले. त्यांच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक अधिकारी आणि शेतकरी येत असत. मागील महिन्यात त्यांनी बांधलेल्या नवीन बंगल्याच्या पूजेला मी आणि बजरंग गोडसे सर गेलो होतो. त्यावेळी खूप गप्पा झाल्या आणि आम्ही सरांचा सत्कार केला. पण स्वप्नातही वाटलं नव्हतं की सर इतक्या लवकर आम्हाला पोरकं करून जातील.

पवित्र एकादशीच्या दिवशी दि.२७ मे २०२६ रोजी आदरणीय पिसे सरांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आज सर आमच्यात नसले तरी त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार, जिद्द, चिकाटी आणि कर्मवीर अण्णांचे विचार आमच्या जीवनात कायम जिवंत राहतील.

अशा आमच्या लाडक्या गुरुजनांना भावपूर्ण श्रद्धांजली !

नवनाथ सोनबा अडसूळ
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव डाकू
तथा अध्यक्ष, आदर्श बहुजन शिक्षक संघ, नाशिक विभाग