आ. रोहित पवार, खा. निलेश लंके यांच्याकडून चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

कर्जत : प्रा. किरण जगताप

लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, न्यायप्रिय आणि दूरदर्शी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी (ता. जामखेड) येथे मध्यरात्री ठीक १२ वाजता अहिल्यादेवींच्या स्मारकास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी चोंडी येथील महादेवाच्या मंदिरात मनोभावे पूजा आणि अभिषेक करण्यात आला, ज्यानंतर अहिल्यादेवींच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला मिळणे हे आपले मोठे भाग्य असल्याचे सांगितले. समाजहिताचे प्रत्येक काम करताना अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कामांचा आदर्श कायम डोळ्यासमोर असतो आणि भविष्यातही याच आदर्शावर काम करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यादेवींची जयंती हा कोट्यवधी लोकांसाठी एक आनंदसोहळा असून, या सोहळ्याचा भाग होता येणे ही अत्यंत समाधानाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले. या जयंती सोहळ्यामुळे संपूर्ण चोंडी परिसरामध्ये उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.