
कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील रहिवासी तुकाराम गोविंद बरकडे यांची ‘सिडको’ मध्ये ‘उपनियोजनकार (वर्ग-१)’ या उच्च पदावर नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे अळसुंदे आणि परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावकऱ्यांच्या वतीने टेंबी येथील वस्तीशाळेत त्यांच्या गौरव सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर उपसरपंच तथा ‘युक्रांद’चे तालुका संघटक दिलीप खरात प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून केवळ तुकाराम यांचाच नव्हे, तर त्यांच्या या यशाचे खरे शिल्पकार असलेले त्यांचे वडील गोविंद बरकडे आणि आई द्वारकाताई गोविंद बरकडे यांचाही गावकऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना तुकाराम बरकडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या यशात आई-वडिलांच्या कष्टाचा जितका वाटा आहे, तितकाच आपल्या शिक्षकांचा आणि मित्रांचाही पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आगामी काळात गावासाठी भरीव काम करण्याचा मानस असून, आपले संपूर्ण कुटुंब यापुढेही सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहील, अशी खात्री त्यांनी गावकऱ्यांना दिली.
या कौतुक सोहळ्याला अप्पा अनारसे, शिवाजी चिंधे, रामकृष्ण अनारसे, सचिन बरकडे, जवान बरकडे, गणेश बरकडे, गणेश पारेकर, कुणाल अनारसे, रोहित उकले, सार्थक अनारसे, माऊली बरकडे, संग्राम उकले, जनार्दन गलांडे, राजू खरात आणि संतोष बरकडे यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सतीश खामगळ यांनी केलेल्या प्रास्ताविकाने झाली, तर शेवटी उपस्थितांचे आभार देवीदास बरकडे यांनी मानले.


