तुतारीवाले संपलेल्या पक्षाचे ‘मच्छर’, माझ्या कामामुळे रोहित पवारांसह कार्यकर्त्यांना झोंबले

कर्जत : प्रा. किरण जगताप

भाजपचे सुनील यादव यांचा भूषण ढेरे यांच्यावर पलटवार

कर्जत तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या कथित शेतकरी छळाच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे भूषण ढेरे यांनी शिरसाट यांची पाठराखण केल्यानंतर, भाजप नेते सुनील यादव यांनी ढेरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात सडेतोड पलटवार केला आहे. भूषण ढेरे आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी केवळ विरोधाला विरोध करण्याचे काम करत असून आपण असल्या ‘मच्छरांना’ मोजत नाही, अशी आक्रमक भूमिका यादव यांनी घेतली आहे.

भारतीय जनता पार्टीचा एक नेता म्हणून मी मैदानात काम करत आहे आणि हेच आमदार रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना सहन होत नसल्याने माझ्या प्रत्येक भूमिकेला विनाकारण विरोध केला जात असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.


भूषण ढेरे यांनी शिरसाट यांच्या कार्यकाळातील ज्या कामगिरीचे गुणगान गात रस्ते खुले केल्याचा दावा केला होता, त्याचा सुनील यादव यांनी खरपूस समाचार घेतला. वास्तविक पाहता शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्याच्या हक्काच्या रस्त्यासाठी आपण ही भूमिका यापूर्वीच घेतली होती, असे सांगत यादव यांनी ढेरे यांचे दावे फेटाळले. सोपान शिरसाट यांनी कर्जत येथे आल्यापासून फक्त रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनाच न्याय देण्याचे आणि त्यांचे हित जपण्याचे काम केले, म्हणूनच आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एवढे झोंबले आहे, असा टोला त्यांनी लगावला. आपण जनतेचा कोणताही मुद्दा उपस्थित केला की रोहित पवार तातडीने आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात बोलते करतात, यावरूनच त्यांचा जळफळाट स्पष्ट होतो, असेही यादव म्हणाले.

शिरसाट यांच्या कथित प्रामाणिकपणाचा ढेरे यांनी घेतलेला छडा पूर्णपणे खोडून काढताना सुनील यादव यांनी गंभीर आरोप केले आहेत. कर्जतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी आपल्या कार्यकाळात अनेकांकडून ‘माल’ घेऊन खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे केले आहे. त्यांनी सामान्य माणसावर प्रचंड अन्याय केला असतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची अशी जाहीर पाठराखण का करत आहेत, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला. याचा सरळ अर्थ असा की यामध्ये काहीतरी ‘पाणी मूरत’ असून, शिरसाट यांनी आपल्या काळात वेगवेगळ्या बेकायदेशीर मार्गाने राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांचा मोठा फायदा करून दिला असावा, अशी शंका यादव यांनी व्यक्त केली आहे. याच आर्थिक आणि राजकीय फायद्यामुळे शिरसाट यांच्यावर बोलताच राष्ट्रवादीवाले अस्वस्थ झाले आहेत.
शेवटी राष्ट्रवादीच्या टीकेला केराची टोपली दाखवत सुनील यादव यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. भूषण ढेरे आणि त्यांच्यासारखे राष्ट्रवादीचे लोक कितीही बोंबलले तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही, कारण आपला पक्ष संपलेला असून त्यांचे कार्यकर्ते लोकांचे एकही काम करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यंत सोबत असून, नुकताच त्या शेतकऱ्याचा आपल्याला फोन आल्यामुळे आता थेट एसपी कार्यालयात जाऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असल्या ‘मच्छरांना’ न जुमानता आपण जनतेची कामे अशीच चालू ठेवणार असल्याचे सुनील यादव यांनी म्हटले आहे.