कर्जत : मानवी जीवितास घातक असणारे ड्रग्जचे ७७ इंजेक्शन पोलिसांकडून जप्त

कर्जत : प्रा. किरण जगताप

मानवी जीवितास अपायकारक तसेच विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या बेकायदेशीर ड्रग्जची विक्री करणाऱ्यांवर मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५८ हजार ६४० रुपये किमतीचे ‘मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शन आयपी’ नावाचे एकूण ७७ ड्रग्जचे इंजेक्शन जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार ९ जून रोजी मिरजगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार गस्त घालत होते. दरम्यान, पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पप्पू उर्फ प्रवीण लाला भोसले (रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत) याने रोहन भाऊसाहेब लाढाणे (वय २२ वर्षे, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत) या तरुणाला बेकायदेशीररित्या ड्रग्जचे इंजेक्शन विकण्यासाठी बाभुळगाव खालसा येथील महामार्ग पुलाखाली पाठवले आहे.

हे ड्रग्जचे इंजेक्शन मानवी जीवितास अत्यंत धोकादायक व हानिकारक असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही तरुणाईकडून नशा करण्यासाठी तसेच व्यायामशाळेत व्यायाम करताना शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी या इंजेक्शनचा गैरवापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ बाभुळगाव खालसा येथील महामार्ग पुलाखाली सापळा रचून थांबलेला संशयित आरोपी रोहन भाऊसाहेब लाढाणे याची झडती घेतली. त्याच्याकडे पोलिसांना मेफेन्टर्माइन सल्फेटचे इंजेक्शन मिळून आले. त्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इंजेक्शन पुरवठादार पप्पू उर्फ प्रवीण लाला भोसले याच्या घराच्या परिसराची पोलिसांनी झडती घेतली असता, तेथे आणखी ड्रग्जचे इंजेक्शन सापडले. पोलिसांनी एकूण ५८ हजार ६४० रुपये किमतीचे ७७ इंजेक्शन जप्त केले आहेत.
या प्रकरणी आरोपी रोहन भाऊसाहेब लाढाणे (वय २२ वर्षे) आणि फरार असलेला मुख्य आरोपी प्रवीण उर्फ पप्पू लाला भोसले (दोन्ही रा. बाभूळगाव खालसा, ता. कर्जत) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, १२५, २७८ सह औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत आहेत. मिरजगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मिरजगाव व बाभुळगाव खालसा परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परिसरात अशा प्रकारे ड्रग्ज इंजेक्शन किंवा कोणत्याही अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन मिरजगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.