
कर्जत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्यावर भाजप नेते सुनील यादव यांनी केलेल्या आरोपांनंतर कर्जत मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिरसाट यांनी एका शेतकऱ्याला शेतातील रस्त्याच्या वादातून अश्लील शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप सुनील यादव यांनी केला होता, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ग्रॅच्युइटी रोखण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक कर्जत शहराध्यक्ष भूषण ढेरे यांनी सुनील यादव यांचे सर्व आरोप सडेतोडपणे फेटाळून लावले आहेत.

शिरसाट साहेबांनी कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता सर्वसामान्य जनतेला न्याय दिला असून त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा पलटवार ढेरे यांनी केला आहे. यादव यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देताना भूषण ढेरे यांनी सोपान शिरसाट यांच्या कार्यकाळातील धडाकेबाज कामगिरीचा लेखाजोखाच मांडला आहे.

सुनील यादव यांनी केलेल्या शेतकरी छळाच्या आरोपाला उत्तर देताना भूषण ढेरे यांनी सांगितले की, वास्तविक पाहता ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची शेती असूनही काही गावांमधील दबंग व्यक्तींनी त्यांचे रस्ते अडवून त्यांना वर्षानुवर्षे वेठीस धरले होते, अशा पीडित शेतकऱ्यांच्या बांधावर थेट स्वतः जाऊन शिरसाट साहेबांनी तातडीने रस्ते खुले करून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या उलट त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. कर्जत शहरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या ‘आपले कॅफे’ व ‘मराठी कॅफे’ सारख्या अवैध ठिकाणांवर छापे टाकून त्यांनी मोठी कारवाई केली.
तसेच संपूर्ण कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमधील हातभट्टी, वाळू तस्करी, जुगार आणि मटक्याचे जाळे कायदेशीर बडगा उगारून पूर्णपणे उद्ध्वस्त केले, जे काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे.
राशीन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा दाखला देत भूषण ढेरे यांनी यादव यांचे आरोप खोडून काढले.
आई जगदंबा देवीचे पावन तीर्थक्षेत्र असलेल्या राशीन शहरात वर्षानुवर्षे सुरू असलेले अवैध गोवंश तस्करीचे मोठे रॅकेट आजपर्यंत कोणीही बंद करू शकले नव्हते, ते पूर्णपणे बंद करण्याचे धाडस सोपानराव शिरसाट यांनी दाखवले. त्यांनी अवघ्या ५ महिन्यांत १७ गुन्हे दाखल करून हे रॅकेट १०० टक्के मोडीत काढले असून, काही गो-तस्करांना २ वर्षांसाठी हद्दपार करण्याचे प्रस्तावही मंजुरीसाठी पाठवले आहेत. याशिवाय गुन्हेगारांवर वचक निर्माण करताना गायकरवाडी येथील बहुचर्चित खून प्रकरणाचा तपास त्यांनी अत्यंत गतीने केला असून, आरोपी लवकरच जेलमध्ये असतील. अगदी सेवानिवृत्तीला अवघे ४ दिवस बाकी असताना २७ मे २०२६ रोजी गौरव हॉटेल येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपींना तर त्यांनी अवघ्या ५० मिनिटांत काष्टी येथे जाऊन अत्यंत शिताफीने बेड्या ठोकून जेलमध्ये धाडले, ही त्यांची कर्तव्यदक्षता आहे.
पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळावर बोलताना ढेरे यांनी स्पष्ट केले की, कर्जत पोलीस स्टेशन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्टाफ अत्यंत कमी असताना देखील शिरसाट यांनी उत्तमरीत्या कायदा व सुव्यवस्था हाताळली. श्री संत सद्गुरु गोदड महाराज रथोत्सव, शिवजयंती, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती या सर्व महापुरुषांच्या उत्सवांमध्ये अतिशय शिस्तबद्ध व उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून त्यांनी तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे १३ जून २०२५ रोजी चार्ज घेतल्यापासून कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता, निर्भीडपणे व निष्पक्षपातीपणे काम करणाऱ्या अशा प्रामाणिक अधिकाऱ्यावर केवळ राजकीय आकस ठेवून केले जाणारे आरोप कर्जतची जनता कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा भूषण ढेरे यांनी दिला आहे.

