
कर्जत तालुक्यातील कोरेगाव परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सध्या उष्णतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सततच्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज तसेच व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना पंखे, कूलर व इतर विद्युत उपकरणांचा वापर करणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रोजच वेगवेगळ्या कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल अडसूळ यांनी संबंधित वीज वितरण विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. कोरेगाव परिसरातील वीज यंत्रणेची सखोल तपासणी करून वारंवार उद्भवणारे तांत्रिक दोष दूर करावेत व नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
अडसूळ म्हणाले कोरेगाव परिसरात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करावा.
तसेच कोरेगाव येथील ग्रामस्थांनी देखील प्रशासन व वीज वितरण कंपनीने या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्वरित तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

