निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार? भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांचा ‘डबल ढोलकी खेळ’ थांबवा

कर्जत : प्रा. किरण जगताप

राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष मंगेशबापू शिंदे आक्रमक

कर्जत नगरपंचायत सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षात ऐन वेळी आलेल्या काही नेत्यांकडून निष्ठावंतांची मोठी घुसमट केली जात असून, भाजपच्या उमेदवारांना छुपी मदत करणाऱ्या अशा नेत्यांनी आपला ‘दोन ढोलकीचा खेळ’ ताबडतोब थांबवावा, असा थेट इशारा राष्ट्रवादी सोशल मीडियाचे कर्जत शहराध्यक्ष मंगेशबापू शिंदे यांनी दिला आहे. ऐन वेळी पक्षात आलेल्या नेत्यांना सर्वोच्च पदांची संधी मिळते, मात्र वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता आज भरकटला जात असल्याची खंत व्यक्त करत मंगेश शिंदे यांनी स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, केवळ स्वार्थासाठी पक्षात आलेले हे नेते पक्षाची कुठलीही विचारधारा सांभाळत नाहीत. मूळ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात न घेता, केवळ ‘आपणच सर्व काही आहोत’ या अहंकारातून पक्षातच गटबाजीचे राजकारण केले जात आहे. पक्षासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या निष्ठावंतांना बाजूला सारून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
आमदार रोहितदादा पवार यांच्या संघर्षाची आठवण करून देताना मंगेश शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळावी, यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी तीन दिवस अन्नत्याग उपोषण केले होते. मात्र, हे उपोषण संपल्यानंतर पंढरपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून रोहितदादांची जाहीर खिल्ली उडवली होती आणि त्यांचा अवमान केला होता. रोहितदादांचा असा थेट अपमान करणाऱ्या त्याच भाजपच्या उमेदवारांना आपण आता कुठल्या नैतिकतेच्या आणि भावनेच्या आधारावर मदत करणार आहात? याचे स्पष्टीकरण संबंधित नेत्यांनी आधी दिले पाहिजे.

कर्जत शहरातील सुज्ञ नागरिकांनी आणि मतदारांनी कोणत्याही स्थानिक नेत्याला बघून नव्हे, तर केवळ आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आणि कामावर विश्वास ठेवून नगरपंचायतची सत्ता पूर्ण बहुमताने दादांच्या ताब्यात दिली होती. अशा वेळी रोहितदादांच्या पाठीत खंजीर उपसणाऱ्या विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या नेत्यांमुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.